इंदापूर – राज्याच्या राजकारणात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस मित्रपक्ष(Congress-NCP) असले तरी संधी मिळताच दोघंही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. काही महिन्यांपूर्वी राज्यातील काँग्रेसमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. आक्रमक असलेल्या नाना पटोलेंना(Nana Patole) राज्यातील काँग्रेसची जबाबदारी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये तिन्ही पक्षाचं सरकार असलं तरी काँग्रेसच्या अस्तित्वाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जातात.
गुरुवारी पंढरपूर पोटनिवडणुकीचा प्रचार संपवून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेइंदापूरात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नाना पटोलेंनी केलेल्या एका विधानामुळे सगळ्यांच्या भूवया उंचावल्या. नाना पटोलेंनी केलेलं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आणि राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे. नाना पटोलेंनी पुढील निवडणुकीत इंदापूरात काँग्रेसचाच आमदार असेल असा दावा केला आहे. इंदापूरची जागा काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी नेहमी महत्वाची असते.
याठिकाणी भाजपात प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील(BJP Harshawardhan Patil) हे काँग्रेसचे आमदार होते. हर्षवर्धन पाटील यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ही जागा राष्ट्रवादीला सोडल्याने भाजपात प्रवेश केला होता. हर्षवर्धन पाटील या मतदारसंघातून नेतृत्व करत होते. परंतु मागील २ निवडणुकांमध्ये हर्षवर्धन पाटील यांच्या गडाला सुरूंग लावण्याचं काम दत्तात्रय भरणे यांनी केले आहे. दत्तात्रय भरणे हे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू शिलेदार आहेत. दत्तात्रय भरणे यांनी २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. नाना पटोलेंनी केलेल्या विधानामुळे दत्तात्रय भरणे आणि अजित पवार दोघांचेही टेन्शन वाढवलं आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
इंदापूर तालुक्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे. गावागावात काँग्रेसला लोकं मानतात. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत इंदापूरचा आमदार काँग्रेसचा असेल. त्याचसोबत जे कोणी काँग्रेसला मानणारे आहेत त्यांच्यासाठी पक्षात जागा खाली आहे. मात्र संधी साधूसाठी जागा नाही. ज्यांना एक पक्ष म्हणून काम करायचं आहे. सत्तेसाठी नाही अशांना काँग्रेसचं दार उघडं आहे. २०२४ मध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष राहणार आहे असा दावा नाना पटोलेंनी केला.