बंगळुरू : ब्रिटनचा नवीन कोरोना व्हायरस स्ट्रेन आणि नाताळ, नव वर्षाच्या स्वागतासाठी होणारी गर्दी पाहून महाराष्ट्र सरकारने नाईट कर्फ्यू लागू केला होता. यानंतर लगेचच कर्नाटक सरकारनेही नाईट कर्फ्यू लागू करत असल्याची घोषणा केली होती. मात्र, याच्या एका दिवसातच अचानक हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा यांनी बुधवारी ट्विट करून नाईट कर्फ्यूबाबत माहिती दिली होती. यानुसार 24 डिसेंबरपासून 2 जानेवारी 2021 पहाटेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू होत असल्याचे ते म्हणाले होते. तसेच २४ डिसेंबरच्या रात्री नाताळचा सण म्हणून लोकांना कोरोना गाईडलाईनमधून सूट दिली जाणार होती. मात्र, लोकांचा विरोध होऊ लागताच तांत्रिक समितीने दिलेल्या सल्ल्याचे कारण देत कर्नाटक सरकारने यू-टर्न घेतला आहे.
येडीय़ुराप्पा यांनी सांगितले की, नाईट कर्फ्यूची काही गरज नव्हती. लोकांची मते पाहून, मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसोबत व अधिकाऱ्यांशी बोलून हा निर्णय मागे घेण्यात येत आहे. मात्र, लोकांनी मास्क, हात वारंवार धुणे, सोशल डिस्टन्सिंग आदी काळजी घ्यावी. यामुळे कोरोनाला रोखता येईल, असे सांगितले.
तर दुसरीकडे एयर इंडिया एक्सप्रेस (Air India Express) ने प्रवाशांसाठी एक सूचना जारी केली आहे. जे प्रवासी कर्नाटकमध्ये येत आहेत, त्यांनी 72 तास आधी आरटीपीसीआर टेस्ट करावी, ही टेस्ट निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सोबत आणावा. अन्यथा कर्नाटकातील विमानतळवर पोहोचल्यावर त्यांची आरटी-पीसीआर करणे बंधनकारक आहे, असे म्हटले आहे.