मुंबई - नाणार रिफायनरी प्रकल्पामध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाने नाणार प्रकल्पबाधितांची १४०० एकर जमीन विकत घेतल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते निलेश राणे यांनी केला होता. आता या आरोपाला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपाचे आऊटडेटेड झालेले नेते निलेश राणे यांनी मोठा जावईशोध लावला आहे. त्यांच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही. ते अभ्यास करून बोलत नाहीत, असा टोला शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लगावला आहे.निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना विनायक राऊत म्हणाले की, भाजपाचे आऊटडेटेड झालेले नेते निलेश राणे यांनी मोठा जावईशोध लावला आहे. नाणार रिफायनरीबाबतच्या बैठका मंत्रालयात आणि वर्षावर होतात, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे. मात्र त्यांच्या या आरोपांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. त्यांनी केलेले आरोप बेछूट आणि पोरकटपणाचे आहेत. तसेच नाणारबाबत उद्धव ठाकरे यांनी स्थानिक जनतेला दिलेला शब्द हेच वचन असल्याचेही राऊत यांनी सांगितले.
विनायक राऊत यांनी केलेल्या या टीकेला निलेश राणेंनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खासदार विनायक राऊत यांना शिवसेनेत काडीची किंमत नसल्यामुळे जगामध्ये कोणालाच किंमत नाही असे त्यांना वाटते. शिवसेनेचे पहिल्या क्रमांकाचे नेतेही त्यांना फारशी किंमत देत नाहीत, असे निलेश राणेंनी म्हटले आहे. नाणार प्रकल्पावरुन माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर काल गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाने नाणार प्रकल्पबाधितांची १४०० एकर जमीन विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला. तर या जमिनीच्या व्यवहारात ८० टक्के परप्रांतीयांना जमिनी दिल्या असल्याचाही दावाही निलेश राणेंनी केला होता.याबाबत निलेश राणेंनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली होती, त्यावेळी ते म्हणाले की, नाणार प्रकल्प रद्द झाला आहे असे सांगितले जात असताना मुख्यमंत्री कार्यालयाशी चर्चा का होतेय? ही चर्चा प्रकल्प रायगडमध्ये नेण्यासाठी नव्हे तर राजापूर तालुक्यात नाणारमध्ये हा प्रकल्प राबवण्यासाठी कंपनी आणि शासनातील काही अधिकारी प्लॅनिंग करत आहेत. नाणार पुन्हा राजापूर तालुक्यात आणण्यासाठी हे एकत्र आले आहेत. नाणारमध्ये सुगी डेव्ल्हपर्स म्हणून कंपनी आहे, त्यात निशांत सुभाष देशमुख हे संचालक आहेत, ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. त्यांनी १४०० एकर जमिनीचा व्यवहार केला आहे. हा व्यवहार ज्यांनी केला ते अँड. कावतकर हे कोदवलीचे आहेत. सगळे व्यवहार एलएलपी म्हणजे लिमिटेड लायब्रेटी पार्टनरशिपद्वारे झाले, २०१४ ते २०१९ या काळात व्यवहार झाला, असा दावा निलेश राणेंनी केला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्याश्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता
आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार
ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले
शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी