मुंबई – राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांभोवती अनेक वाद निर्माण झाले आहेत. एकीकडे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे तर दुसरीकडे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्कारासारखा गंभीर आरोप लावला आहे. या दोन्ही घटनांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत सापडल्याचं चित्र आहे. यातच खुद्द शरद पवारांनीधनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर असल्याचं विधान केले आहे.
नवाब मलिक यांच्यावर कोणतेही वैयक्तिक आरोप नाही, त्यांच्या नातेवाईकांना अटक केली म्हणून त्यांचा राजीनामा घ्यावा ही मागणी चुकीची आहे. नवाब मलिकांनी स्वत: या प्रकरणी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवत गुन्हेगार कोणीही असो शिक्षा होईल असं म्हटलं आहे. त्यामुळे नवाब मलिकांना शरद पवारांनी क्लीनचिट दिली आहे. परंतु धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप आहे. याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं शरद पवार म्हणाले होते, रात्री उशिरा याबाबत पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली, त्यामध्ये तुर्तास धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी सखोल चौकशी होऊ द्या, मग पुढे निर्णय घेऊ असं सांगत राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
मात्र राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर होणाऱ्या या आरोपामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. निलेश राणेंनी ट्विट करत म्हटलंय की, नरेंद्र मोदी यांच्यामुळे डिजिटल पेमेंट करायची लोकांना सवय झाली आणि डिजिटल पेमेंटमुळे नवाब मलिक यांचा जावई ड्रग्सच्या प्रकरणात पकडला गेला. राष्ट्रवादीत चाललंय काय? इतके क्रिमिनल मिळून एका जेलमध्ये नसतील तितके एका पक्षात आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच विश्वास नांगरे पाटील आणि शरद पवार भेटीवरही निलेश राणेंनी भाष्य केलं आहे. मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या प्रकरणासाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? असा सवाल उपस्थित करत हे प्रकरण झाकायचा अजेंडा दिसतोय, यामुळे पोलिसांवर लोकांचा विश्वास उडेल, सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का? हे पण आयुक्तांनी सांगावं अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.
धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणाला वेगळंच वळण
मंत्री धनंजय मुंडे बलात्कार प्रकरणी आरोप करणारी तक्रारदार महिला ही ब्लॅकमेलर आहे, तिने आमच्यासोबतही अशाचप्रकारे हनीट्रॅपमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला होता असं सांगत भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनिष धुरी समोर आले आहेत, धनंजय मुंडे यांनीही महिला ब्लॅकमेलिंग आणि बदनामी करण्यासाठी खोटे आरोप करत आहे, तिने माझ्याकडे कोट्यवधी रुपयांची मागणी केलेल्याचे अनेक मेसेज आहेत असा दावा केला होता, त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली शरद पवारांची भेट
गुरुवारी दिवसभर धनंजय मुंडे प्रकरण माध्यमात गाजत असताना विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली, या भेटीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपाबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या भेटीवर भाजपा आमदार अतुळ भातखळकरांनी टीका करत पवारांसोबत चर्चा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.