मुंबई: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी जी परिस्थिती निर्माण केली, तीच परिस्थिती ठाकरे सरकारला राज्यात घडवायची आहे, असा घणाघाती हल्ला भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. तसेच, राज्यात हिंदू सण साजरे करण्यावर निर्बंध लादले, गेल्यावर्षीच्या परिपत्रकावरील तारीख फक्त बदलली, निर्बंध तेच असून हा हिंदूंवर अन्याय आहे, असा आरोपही त्यांनी केला.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने गणेशोत्सवासंदर्भात नियम जारी केले आहेत. या पार्श्वभूमीवर नितेश राणेंनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन, सरकारने जारी केलेले निर्बंध रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन राज्यपालांना दिले. त्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदू सणांवर नियोजितपणे निर्बंद कसे टाकायचे यावर ठाकरे सरकारने भर दिलाय. विविध सणांवर निर्बंध लावून सणाचे महत्व कसं कमी करायचं हाच किमान समान कार्यक्रम ठाकरे सरकारचा आहे. गणेशोत्सावासाठी जी नियमावली काढली, ती गेल्यावर्षीचीच आहे, फक्त तारीख बदलली. या नियमावलीत सण साजरा करू नये असे नियम टाकले आहेत, असा आरोप राणे यांनी केला.
राणे पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जे करत आहेत, तेच काम उद्धव ठाकरे महाराष्ट्रात करत आहेत. हिंदू खतरे में है, अशी परिस्थिती बंगालमध्ये होती, तशीच परिस्थिती महाराष्ट्रात घडवण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. घरात असलेल्या मूर्त्या सहा इंच करा आणि त्याचं विसर्जन करण्यासाठी पालिकेचे लोकं घरी येणार असल्याचं नियमावलीत म्हटलंय. म्हणजे छोट्या छोट्या मिरवणुकाही बंद करण्यात आल्या आहेत. हिंदू सणांचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या सरकारला कोरोना आठवतो. अनेक ठिकाणी गर्दी होते, पार्टा चालतात. बेस्टच्या कार्यक्रमात गर्दी होती, मुख्यमंत्रीही तिथेच होते. मेट्रोच्या कार्यक्रमातही गर्दी होती, ती गर्दी दिसली नाही. पण, जिथे जिथे हिंदूंचे सण येतात तिथे तिथे या सरकारला कोरोना कसा दिसतो?, असा सवालही त्यांनी केला.