नवी दिल्ली: राज्यात सध्या प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार प्रकरण गाजत आहे. यामुळे देशपातळीवर खळबळ उडाली आहे. अब्जाधीशाच्या घराजवळ असा प्रकार घडणे आणि त्यात मुंबई पोलीस दलातील मोठा अधिकाऱ्याचाच हात असणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने धक्कादायक आहे. या प्रकरणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Nitin Gadkari talk on Sachin Vaze, Antilia bomb Scare Case investigation. )
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' (Lokmat Maharashtrian of the year award 2020) कार्यक्रमात आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आले होते. तेव्हा त्यांना सचिन वाझे (Sachin Vaze Case) प्रकरणावर प्रश्न विचारण्यात आला. नितीन गडकरी म्हणाले, जेवढे तुम्ही जाणता तेवढेच मलाही माहिती आहे. वृत्तपत्रामधूनच मला याविषयी कळते. या प्रकरणी चौकशी सुरु असून यावर आता काही बोलणे उचित नाहीय. परंतू देशाच्या हिताच्या दृष्टीने योग्य पद्धतीने चौकशी व्हावी अशी अपेक्षा आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द ईयर अवॉर्ड 2020' चा आजचा दुसरा दिवस असून पहिल्या दिवशी आयएएस अधिकारी आस्तिक कुमार पांडे यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार देण्यात आला. आस्तिक कुमार पांडे हे औरंगाबाद महापालिकेचे आयुक्त आहेत.
केजरीवालांनी मानले मोदींचे आभार
देशात कोरोनाचा प्रभाव वाढत असताना राजधानी दिल्लीमध्येही बिकट परिस्थिती निर्माण झाली होती. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. मात्र केंद्र आणि दिल्ली सरकारच्या नियोजनामुळे लवकरच दिल्लीतील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आली होती. दरम्यान, कोरोनाकाळातील मदतीसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे आभार मानले आहेत.