पटना : बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी संपत नाही तोच आता विधानसभेचे अध्यक्ष निवडीवरून बिहारमधील वातावरण तापले आहे. बिहार विधानसभेच्या पाच दिवशीय अधिवेशनाला आज सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी विधानसभेत राजदच्या आमदारांनी गोंधळ घातला असून नितीश कुमार आणि त्यांच्या एका मंत्र्याच्या उपस्थितीवर आक्षेप घेतला आहे.
मुख्यमंत्री नितीशकुमार आणि त्यांचे मंत्री अशोक चौधरी हे विधान परिषदेचे आमदार आहेत. आज बिहार विधानसभेच्या अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. यामुळे नितीशकुमार सभागृहात आले आहेत. त्यांना पाहताच राजदचे नेते तेजस्वी यादव भडकले. हंगामी अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी नवीन अध्यक्षांची निवड ही आवाजी मतदान पद्धतीने घेण्याचे जाहीर केले आणि राजदच्या नेत्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
तेजस्वी यांनी नितीशकुमार यांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले. तसेच आमदारांनी मांझी यांच्याकडे धाव घेत नियमावलीचे पुस्तक दाखवत आवाजी मतदानावर आक्षेप घेतला. यावर मांझी यांनी विधानसभेबाहेरील जे आलेत ते मतदानात भाग घेणार नाहीत. यामुळे त्यांच्या उपस्थितीची कोणतीही समस्या नाही, असे सांगितले.
यावर तेजस्वी यादव यांनी आक्षेप घेत आवाजी मतदानाने नाही तर नेहमीसारखे मतदान घेऊन विधानसभा अध्यक्ष निवडावा, अशी मागणी केली आहे. येथे जनतेच्या आदेशाचे उल्लंघन केले जात आहे. आम्ही असे होऊ देणार नाही, असे सांगितले. यानंतर झालेला गोंधळ पाहता विधानसभेचे कामकाज 5 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले.
दरम्यान, अध्यक्ष निवडीवरून झालेल्या वादंगानंतर मांझी यांनी आवाजी मतदान रद्द करून नेहमीप्रमाणे मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार 51 वर्षांनी बिहार विधानसभेत मतदान होणार आहे.
राजदच्या आक्षेपावर कामकाज मंत्री विजय कुमार चौधरी यांनी सांगितले की, बिहारची ही परंपरा राहिली आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीवेळी सभागृहाचे नेते म्हणून मुख्यमंत्री हजर राहू शकतात. मात्र, ते सदस्य नसल्याने मतदान करू शकत नाहीत.
लालू प्रसादांचे भाजपा आमदारांना फोन
सुशील कुमार मोदी यांनी लालू प्रसाद यादव हे एनडीएच्या आमदारांना महाआघाडीत सहभागी होण्यासह मंत्रिपदाचं आमिष दाखवत आहेत असा आरोप केला आहे. जेव्हा त्यांनी संबंधित मोबाईल नंबरवर फोन केला तेव्हा तो फोन लालू प्रसाद यादव यांनी स्वतः उचलला असं देखील म्हटलं आहे. लालू प्रसाद यादव तुम्ही तुरुंगात बसून एनडीएचा फोडण्याा कट रचत आहात. यात तुम्हाला यश मिळणार नाही असं देखील सुशील कुमार मोदींनी म्हटलं आहे.