नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सातव्यांदा गळ्यात घातली खरी परंतू ती यावेळी काटेरी ठरणार आहे. बिहारमध्ये पाच नवीन आव्हाने त्यांना दिवसागणिक पेलावी लागणार आहेत. रात्री उशिरा निकाल जाहीर झाले, यामध्ये एनडीएला 125 आणि राजद आघाडीला 110 जागा मिळाल्या आहेत. काय असतील नितीशकुमार यांच्या समोरील ही आव्हाने?
सरकारवर आधीसारखे नियंत्रण ठेवता येणार?नितीशकुमारांना या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. जदयूचे आमदार घटले असून भाजपाचे आमदार वाढले आहेत. जदयूचे 43 तर भाजपाचे 74 आमदार आहेत. यामुळे मुख्यमंत्री जरी नितीशकुमार झाले तरीही त्या प्रमाणात मंत्रिपदे भाजपाच्याच वाट्याला अधिक जातील. तहामध्ये मोठी मोठी खाती भाजपाकडेच जातील, यामुळे आधीसारखे नियंत्रण ठेवणे त्यांना कठीण जाण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी जेव्हा त्यांनी राजदसोबत निवडणूक जिंकली होती, तेव्हा काही महिन्यांतच ते त्रस्त झाले होते.
विरोधकही ताकदवाननितीशकुमारांना यावेळी सहकाऱ्यांसोबत विरोधकही ताकदवान लाभले आहेत. 2005 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून लालूप्रसाद यादव यांचे पतन होत गेले. मात्र, यंदा विरोधात 115 आमदार असणार आहेत. एमआयएमचे पाच आणि राजद आघाडीचे 110. लालू प्रसाद यादव हे तुरुंग आणि हॉस्पिटलमध्ये असल्याने तेजस्वी यादव यांनी एकट्याच्या जिवावर ७५ आमदाप निवडून आणले आहेत. यामुळे तेजस्वी अनुभवाने कमी असले तरीही नितीसकुमारांना नाकीनऊ आणण्याचा प्रयत्न जरूर करणार.
उत्तराधिकारी कोण?निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नितीशकुमारांनी ही माझी शेवटची निवडणूक म्हणून घोषणा केली होती. आता त्यांना वेळोवेळी तुमचा उत्तराधिकारी कोण म्हणून विचारले जाणार आहे. प्रादेशिक पक्ष असल्याने उत्तराधिकारी निवडावाच लागणार आहे. मात्र, गेल्या दीड दशकात ते उत्तराधिकारी निवडू शकलेले नाहीत किंवा आपल्यानंतरचा दुसरा नेता उभा करू शकलेले नाहीत. यामुळे ते यावेळी जिंकूनही हरल्यासारखे भासणार आहेत. पुढील पाच वर्षांत त्यांना पक्ष टिकविण्यासाठी चांगला चेहरा द्यावाच लागणार आहे.
सुशासन परत आणणेनिवडणूक प्रचारावेळी झालेली हुल्लडबाजी, कांदा-दगडफेक आदी गोष्टी जनतेत रोष असल्याचे दाखवत होत्या. यामुळे कमजोर सीएम असल्याचा आरोप त्यांना खोडावा लागणार आहे. सध्याची राजकीय परिस्छिती पाहता हे कठीण दिसत आहे. भाजपाला आवरणे आणि विरोधकांना तोंड देणे या कसरतीत नितीशकुमारांनचा घाम निघण्याची शक्यता आहे. तसेच लोकांचा रागही शांत करावा लागणार आहे.
दारुबंदी नितीशकुमारांनी 2015 मध्ये दारुबंदी केली होती. यामुळे त्यांना महिलांनी जोरदार पाठिंबा दिला होता. सुरुवातीला ही बंदी प्रभावीपणे अवलंबली गेली. आता हीच बंदी गळ्याचा फास बनली आहे. कारण बिहारमध्ये कुठेही खुलेआम दारू विक्री होत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थित ताण आहे. यासाठी दारुबंदी उठवावी लागण्याची शक्यता आहे.