पटणा – बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालात आरजेडी आणि काँग्रेस महाआघाडीला बहुमतासाठी १२ जागा कमी मिळाल्या तर एनडीएला १२५ जागांनी बहुमत मिळालं, मात्र निवडणुकीच्या मतमोजणीत भाजपा आणि नितीश कुमारांनी फेरफार केल्याचा आरोप आरजेडी सातत्याने लावत आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असताना आरजेडीने शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. तर १५ जागांसाठी कायदेशीर लढाई देण्याची तयारीही आरजेडीने केली आहे.
अशातच राष्ट्रीय जनता दलाचे(RJD) बिहार अध्यक्ष जगदानंद सिंह यांनी नितीश कुमार यांच्या शपथविधी सोहळ्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. जगदानंद सिंह म्हणाले की, भाजपाने बिहारच्या जनादेशाचा बलात्कार केला आहे आणि नितीश कुमार त्याची पैदास आहे, नितीश कुमार भाजपाच्या मांडीवर खेळणारे असून यापूर्वीही विश्वासघातातून ते मुख्यमंत्री बनले आहेत असं त्यांनी सांगितले.
तसेच नितीश कुमार विश्वासघातातून मुख्यमंत्री बनत असतात. यंदा ते मुख्यमंत्री असूनही नसल्यासारखे आहेत. भाजपाच्या मांडीवर खेळणारे, संपूर्ण बिहारची जनता आणि मतदारांसोबत भाजपाने बलात्कार केला आहे. जनादेशची चोरी आहे. त्यातूनच नितीश कुमार यांची पैदास आहे असं जगदानंद सिंह म्हणाले.
बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात एनडीएने स्पष्ट बहुमत मिळवलं, तर आरजेडी काँग्रेस महाआघाडीला ११० जागा मिळाल्या. आरजेडीने अनेक जागांवर मतमोजणी आणि टपाल मतांवर आक्षेप घेतला आहे. मात्र निवडणूक आयोगाने आरजेडीचे आरोप फेटाळून लावले आहेत.
नितीश कुमार यांची कसोटी लागणार
नितीश कुमार यांनी याआधी अनेकदा त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. कधीकाळी ते पंतप्रधान मोदींचे कडवे टीकाकार होते. मात्र त्यांच्या आमदारांची संख्या भाजपापेक्षा अधिक होती. त्यामुळे सरकारवर त्यांचा वचक होता. आता परिस्थिती बदलली आहे. भाजपाच्या आमदारांची संख्या वाढल्यानं नितीश कुमार यांच्याकडे सरकारचं नेतृत्त्व राहिलं, तरीही सरकारवर भाजपाचं वर्चस्व असेल. अनेक महत्त्वाची खातीदेखील भाजपाकडे जाऊ शकतात. त्यामुळे या सरकारचं नेतृत्त्व करणं नितीश कुमार यांच्यासाठी आव्हानात्मक असेल.
महाआघाडीत वादाची ठिणगी
महाआघाडीसाठी काँग्रेस ही बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती असं आरजेडी नेते शिवानंद तिवारी म्हणाले होते. त्यावर तेजस्वी यादव यांनी आरजेडी नेते शिवानंद तिवारी यांना लगाम लावावा. ते काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधींबाबत गिरिराज सिंह आणि शाहनवाझ हुसेन यांच्यासारखी भाषा बोलत आहेत. ही बाब आम्हाला मान्य नाही. आघाडीचा धर्म असतो आणि त्याचे प्रत्येक पक्षाने पालन करावे अशी नाराजी काँग्रेसचे नेते प्रेम चंद्र मिश्रा यांनी शिवानंद तिवारी यांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली.