पाटणा : नितीशकुमार यांची रालोआने मुख्यमंत्रीपदी फेरनिवड केली असली तरी ते या पदावर फार काळ राहणार नाहीत, असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे नेते मनोज झा यांनी केला आहे. जनतेने नितीश यांच्याविरोधात कौल दिला असून, ते तो पायदळी तुडवत असल्याची टीकाही झा यांनी केली.
रालोआने विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार केले आहेत. रालोआ आणि महाआघाडी यांच्यात फार कमी जागांचे अंतर आहे. असे असताना ४० आमदार असलेल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसविण्यात येत असल्याचे झा म्हणाले. नितीश यांना लोकांनी नाकारले आहे. लोकांच्या इच्छेचा त्यांनी मान राखायला हवा. तरीही ते हट्टाने मुख्यमंत्रीपदाला चिकटून राहिले असल्याचे झा म्हणाले. नितीशकुमार फार काळ मुख्यमंत्रिपदी राहणार नाहीत, असा दावाही त्यांनी अखेरीस केला.
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मानबिहारमधील कुर्मी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नितीशकुमार चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. बिहारमध्ये सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान आता त्यांच्याकडे जाणार आहे. यापूर्वी हा बहुमान श्रीकृष्ण सिन्हा यांच्याकडे होता.समाजवादी नेते म्हणून ओळख असलेल्या नितीशकुमार यांना त्यांच्या राजकीय जीवन प्रवासात जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, श्रीकृष्ण सिन्हा, कर्पुरी ठाकूर आणि विश्वनाथ प्रतापसिंह यांच्यासारख्या राजकीय दिग्गजांचा सहवास लाभला. जयप्रकाश नारायण यांच्या जनआंदोलनात नितीशकुमार सहभागी झाले होते. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या नितीशकुमार यांनी काही काळ बिहार वीज मंडळात नोकरीही केली; परंतु तिथे ते फारसे रमले नाहीत.