मुंबई – राज्यपाल नियुक्त १२ जागांवरून महाविकास आघाडीत इच्छुकांची गर्दी असताना सरकारने राज्यपालांकडे १२ जणांच्या नावाची यादी सोपवली. मात्र आता विधान परिषदेच्या ५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता आहे. १ डिसेंबर रोजी विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतदान होणार आहे. ही निवडणूक थेट महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी होईल असं सांगितलं जात आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतीही स्पष्ट भूमिका समोर आली नाही.
अर्ज भरण्याची शेवटची मुदत जवळ आली तरी अद्याप कोणता मतदारसंघ कोणी लढवायचा याबाबत महाविकास आघाडीत एकमत झालं नाही. त्यामुळे अद्यापही निवडणुकीचे उमेदवार घोषित केले नाहीत. अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेना पुरस्कृत श्रीकांत देशपांडे विद्यमान आमदार आहेत, मात्र त्यांना काँग्रेसचा विरोध आहे, तसेच पुणे शिक्षक मतदारसंघ कोणी लढवायचा हे महाविकास आघाडीत काही ठरलं नाही, पण काँग्रेसने या जागेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत.
नागपूर पदवीधर काँग्रेस लढणार, तर औरंगाबाद आणि पुणे पदवीधर राष्ट्रवादी काँग्रेस लढणार आहे. मात्र २ जागा ठरल्या नाहीत, पुणे शिक्षक आणि अमरावती शिक्षक मतदारसंघाबाबत निर्णय झाला नाही. अमरावती आणि पुणे जागेसाठी काँग्रेस इच्छुक आहे. १२ नोव्हेंबरला अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे, तरीही अद्याप मतदारसंघ कोणते लढवायचे, उमेदवार कोण याबाबत निर्णय झाला नसल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. यातच आप, मनसेकडून पुणे पदवीधर निवडणुकीचे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित प्रमुख पक्ष कधी निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून गेले होते. त्यांनी साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील (राष्ट्रवादी) यांचा पराभव केला होता. चंद्रकांत पाटील गेल्यावर्षी विधानसभेवर निवडून गेल्याने विधानपरिषदेची जागा रिक्त आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. गंगाधरराव फडणवीस, नितीन गडकरी अशा दिग्गजांनी येथून दीर्घकाळ प्रतिनिधीत्व केले. सध्याचे आमदार अनिल सोले हे भाजपचे नागपूरचे महापौरही राहिले आहेत. भाजपा यावेळी कोणाला संधी देणार या बाबत उत्सुकता असेल. महाविकास आघाडीचा एकत्रित उमेदवारच भाजपासमोर आव्हान उभे करू शकेल.
अमरावती शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी शिक्षक आघाडी श्रीकांत देशपांडे यांनी शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे तत्कालीन अध्यक्ष अरुण शेळके यांचा पराभव केला होता. शेळके यांना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा होता. यावेळी भाजपा काय भूमिका घेणार व काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेचा एकच उमेदवार असेल का या बाबत उत्सुकता राहील. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात गेल्यावेळी राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी भाजपाचे शिरिष बोराळकर यांचा पराभव केला होता. यावेळी राष्ट्रवादी-काँग्रेसला शिवसेनेची साथ मिळाली तर भाजपची वाट खडतर होऊ शकते. पुणे शिक्षक मतदारसंघात गेल्यावेळी महाराष्ट्र राज्य कृती समितीचे दत्तात्रय सावंत यांनी राज्य शिक्षक परिषदेचे भगवानराव साळुंके यांचा पराभव केला होता. सावंत यांना राष्ट्रवादीचा तर साळुंके यांना भाजपचा पाठिंबा होता.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
अधिसूचना व उमेदवारी अर्ज दाखल करणे ५ नोव्हेंबर २०२०
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १२ नोव्हेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी १३ नोव्हेंबर
अर्ज माघार घेण्याची मुदत १७ नोव्हेंबर
मतदानाची तारीख व वेळ १ डिसेंबर, स. ८ ते सायं. ५
मतमोजणी व निकाल ३ डिसेंबर