राज्य सरकारने कोरोनाच्या प्रकोपामुळे राज्यभरात विकेंड लॉकडाऊन लागू केला आहे. तसेच अन्य दिवस निर्बंध असल्याचे सांगत सर्वत्र बाजारपेठा बंद ठेवल्या आहेत. याविरोधात साताऱ्याचे राज्यसभा खासदार उदयनराजेंनी आज आक्रमक पवित्रा घेतला. साताऱ्यातील पोवई नाका येथे उदयनराजेंनी चक्क कटोरा घेऊन रस्त्यावर भीक मांगो आंदोलन केले. यावेळी उद्यापासून नो लॉकडाऊन, म्हणत सरकारी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
निर्णय काहीपण असुदेत, उद्यापासून लॉकडाऊन उठवावा लागेल. तुम्हाला माहीत नाही कसं काय करायचं तोपर्यंत नो लॉकडाऊन. मारामारी झाली तर यू आर रिस्पॉन्सिबल, सुव्यवस्था कलेक्टरची आहे. पोलिसांना चोपून काढतील लोकं. नॉट आऊट ऑफ अँगर, बट आऊट ऑफ भंग, जस्ट रिमेंबर दॅट....अशा शब्दांत उदनराजेंनी सरकारी अधिकाऱ्याला सुनावले.
कोरोना महामारी रोखण्यासाठी प्रशासनाने केलेले लॉकडाऊन हे सर्वसामान्य गरिबांची उपासमार करणारे असून हे लॉकडाऊन तत्काळ उठवा, अन्यथा लोक भुकेपोटी दरोडे टाकतील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रशासनाला दिला.
शनिवारपासून सक्तीचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. या विरोधात खासदार उदयनराजे यांनी सातारा शहरात शनिवारी अनोखे भीख मांगो आंदोलन केले. जमा झालेले पैसे प्रशासनाकडे सुपूर्द करून उदयनराजेंनी कठोरपणे प्रशासनावर टीका केली. कोरोना महामारी रोखण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे, असे कुठला तज्ज्ञ सांगतो, त्याचे स्पष्टीकरण आधी जनतेला व्हायला हवे. आता केलेला लॉकडाऊन अत्यंत चुकीचा आहे. लोक नियम पाळणार नाहीत. उद्यापासून नेहमीप्रमाणे सर्व यंत्रणा सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.
खासदार, आमदार यांच्याकडे जास्त पैसा आहे. लोकांनी त्यांच्या घरांवर दरोडे टाकावेत, असा अनाहूत सल्लादेखील उदयनराजेंनी दिला. लोक संतप्त आहेत, आता भुकेने व्याकूळदेखील होऊ लागले आहेत. त्यामुळे भुकेच्या त्रासापायी लोक पोलिसांवरदेखील हात उचलायला आता कमी पडणार नाहीत, असेदेखील त्यांनी ठणकावले.
सातारकरांच्या प्रश्नावर उदयनराजे यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झालेला आहे. तसेच सरकारने याबाबत निर्णय जाहीर केला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, अशी मागणी सामान्य सातारकर करत आहेत.
राजेशाही असती तर त्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतंकोरोनाचे कारण पुढे करून शासन वारंवार गोरगरिबांच्या पोटावर पाय आणत आहे. ज्या लोकांची प्रतिकारशक्ती कमी होते, असे लोक मरण पावतात. मात्र, भीक-भुकेपोटी मरणाचे प्रमाणदेखील वाढणार आहे, हे शासनाने लक्षात घ्यावे. कुठलेही कारण झाले की, लॉकडाऊन काय तुमच्या बापाचं राज्य आहे का? राजेशाही असती तर या सगळ्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं असतं, असा इशारादेखील उदयनराजे यांनी दिला.