पुणे - शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणूका आम्हीच जिंकणार आहोत, भारतीय जनता पार्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही, सहकारी पक्षाला वाइट वागवण्याची पद्धत त्यांची आहे, आमची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. शिक्षक व पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी संयुक्त बैठक झाली. जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजीत कदम हे मंत्री, खासदार, वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यावेळी उपस्थित होते. काँग्रेसकडे ऊर्जा खाते असल्यानेच राष्ट्रवादी वाढीव वीज बिले माफ करायला तयार नाही अशी टीका करणार्या भाजपाचा पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, सहकारी पक्षाला भाजपा कसा वागवतो ते मागील ५ वर्षात शिवसेनेला त्यांनी दिलेल्या वागणूकीवरूनच दिसले. आमची तशी पद्धत नाही. मुख्यमंत्री ठाकरे सर्वसहमतीनेच प्रत्येक निर्णय घेतात. फडणविसांच्या सत्ताकाळातच महावितरणची थकबाकी ६७ हजार कोटी झाली. आम्ही त्यातून मार्ग काढतो आहोत. महावितरण वाचले पाहिजे व ग्राहकांनाही दिलासा मिळावा असा ऊपाय काढण्यासाठी महाआघाडी खंबीर आहे.पाचही मतदार संघात महाआघाडीचे प्रचाराचे नियोजन झाले आहे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रश्न आहेतच. मागील ५वर्षात धोरणात्मक निर्णय केंद्र, राज्य सरकारने घेतले नाहीत. त्यामुळे आर्थिक संकट कोविडच्या आधीच आले होते असे पाटील म्हणाले. मुंबई महापालिका तसेच अन्य निवडणूकांना अजून बराच मोठा कालावधी आहे, त्यावेळी काय करायचे, कसे करायचे याचा निर्णय आता घेणे योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊनच मुंबई इतर भागात काळजी घ्यायला हवी. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी स्थिती आहे, त्यामुळेच तिथे स्थानिक प्रशासनाला निर्णय घ्यायला सरकारने मुभा दिली आहे. मुंबईत बसून यवतमाळचा निर्णय कसा घेणार इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता नाही या टिकेला काही अर्थ नाही असे पाटील म्हणाले.
पराभव होणार हे पक्के माहिती असणारेच "आम्ही त्यांना चितपट करू" वगैरे बोलतात. देवेंद्र फडणवीस यांचे तेच सुरू आहे, प्रयत्न करत असतील तर करू द्या, ते फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही अशा शब्दात पाटील यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.