नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षापासून देशात थैमान घालत असलेल्या कोरोनाला रोखण्यात आलेले अपयश, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे केंद्रात सत्तेवर असलेल्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा पराभव होईल असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. त्यातच आता केंद्रातील मोदी सरकार हे २०२४ पर्यंत सत्तेत राहणार नाही, हे सरकार लवकरच कोसळेल आणि देशात मध्यावधी निवडणूक लागेल, असे भाकित हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि इंडियन नॅशनल लोकदलचे प्रमुख ओमप्रकाश चौटाला यांनी केले आहे. ( "No need to wait for 2024, Modi government will collapse soon", om prakash chautala predicts)
ओमप्रकाश चौटाला म्हणाले की, भाजपाच्या चुकीच्या धोरणांमुळे देशातील प्रत्येक नागरिक दु:खी आहे. मला असे दिसते की देशातील लोकांना २०२४ ची वाट पाहावी लागणार नाही. कुठल्याही वेळी देशात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. दरम्यान, ओमप्रकाश चौटाला यांनी हरियाणामधील सरकारवरही टीका केली आहे. राज्यात सध्या सत्तेवर असलेले भाजपा-जजपा सरकारही २०२४ पर्यंत सत्तेत टिकणार नाही. ही आघाडी पूर्णपणे कमकुवत झाली आहे. आमदारांवर त्यांचे नियंत्रण राहिलेले नाही. इंडियन नॅशनल लोकदल सोडून गेलेल्या लोकांना आता त्यांच्या निर्णयाचा पश्चाताप होत आहे. आता ते पुन्हा एकदा इंडियन नॅशनल लोकदलमध्ये येऊ इच्छित आहेत.
चौटाला पुढे म्हणाले की, इंडियन नॅशनल लोकदलला असलेला लोकांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. आता कार्यकर्त्यांनी जनसंपर्क अभियान चालवून पक्षाला मजबूत केले पाहिजे. तसेच शेतकरी आंदोलनाला भक्कम करण्यासाठी आपले पूर्ण सहकार्य दिले पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांवर कायदे लादून त्यांना आपल्याच शेतात मजूर बनवले आहे. आता शेतकरी आंदोलनामुळे सरकारची पाळेमुळे हलली आहेत.
आज हरियाणामध्ये भय आणि भ्रष्टाचाराचे वातावरण आहे. इंडियन नॅशनल लोकदल पुन्हा सत्तेत आल्यास शिक्षण आरोग्य, रोजगार यासाठी सरकारचे धोरण ठरवले जाईल. ओमप्रकास चौटाला यांनी सांगितले की, इतर पक्षांमध्ये तिकीट पैशांवर मिळते. मात्र इंडियन नॅशनल लोकदल पक्षामध्ये तिकिांचे वाटप जनता करते. इंडियन नॅशनल लोकदल उमेदवारांकडून पैसे घेत नाही तर त्यांची मदत करते.