- नजीर शेख औरंगाबाद : राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी पहिल्या दोन टप्प्यांत १७ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानही पार पडले आहे. राज्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जात आहेत. २०१४ साली भाजप-शिवसेना युतीने ४२ जागा जिंकल्या होत्या. यंदा त्या जागा टिकविण्याचे मोठे आव्हान युतीसमोर आहे. यासंदर्भात खा. दानवे यांच्याशी केलेली ही बातचीत.राज्यात प्रदेशाध्यक्ष म्हणून तुमच्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीचे विश्लेषण तुम्ही कसे कराल?२०१४ साली आम्ही विरोधात होतो. त्यानंतर सत्तेवर आलो. कोणताही पक्ष सत्तेत आला की, संघटना बांधणीकडे दुर्लक्ष होते. भाजप आणि काँग्रेसमध्ये मोठा फरक आहे. आमची ‘केडर’ पार्टी आहे. सत्तेवर आल्यानंतरही आम्ही पक्ष संघटनेकडे देशात आणि राज्यातही दुर्लक्ष केले नाही. सरकार आणि पक्ष संघटना या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या. पक्ष संघटनेच्या बळावर राज्यात एकेकाळी चौथ्या क्रमांकावर असलेला आमचा पक्ष प्रथम क्रमांकाचा झाला. निवडणुका जिंकण्यावर आम्ही भर दिला.राज्यात २३ खासदार आणि १२२ आमदार हे सर्व आम्ही स्वबळावर जिंकलो. त्याचा फायदा असा झाला की, राज्यात पक्ष संघटना आणखी मजबूत झाली. राज्यात ८७ हजार बुथचे आम्ही गठण केले. २८८ विधानसभा मतदारसंघनिहाय पूर्णवेळ विस्तारक नेमले. लोकसभा मतदारसंघासाठी वेगळे विस्तारक नेमले. प्रत्येक बुथला एक प्रमुख नेमला. एक बुथ आणि २५ युथ, अशी स्थिती निर्माण केली. बुथप्रमुखांचे मेळावे घेतले. बुथ कसे सांभाळावे याचे प्रशिक्षण दिले. बुथप्रमुखांना २३ कामे दिली. कार्यकर्ते सतत सक्रिय ठेवले. पक्षाच्या या स्थितीचा परिणाम असा झाला की, आज राज्यात ९० नगरपालिका, १० जिल्हा परिषदा आणि १८ महापालिका आमच्या ताब्यात आहेत. सत्ता येण्यात पक्ष संघटनेचा मोठा वाटा आहे. या स्थितीचा पक्षाला भविष्यात अनेक वर्षे फायदा होऊ शकतो. प्रदेशाध्यक्ष म्हणून मी राज्यात अनेक वेळा दौरे केले. मागील साडेचार वर्षांत अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी मी तीन वेळा मुक्कामी दौरे केले. पक्षासाठी वेळ दिला. शिवसेनेने शाखाप्रमुख अशी कार्यकर्त्यांची ओळख निर्माण केली. तशी आम्ही कार्यकर्त्यांची ‘बुथप्रमुख’ अशी ओळख निर्माण केली.प. महाराष्टÑात पक्षासाठी अवघड परिस्थिती होती. तिथे काय केले?पश्चिम महाराष्ट्रात पक्ष संघटनेचा हाच ‘फॉर्म्युला’ वापरला. मुळात पश्चिम महाराष्टÑात काँग्रेसबद्दल फार मोठा असंतोष आहे. पश्चिम महाराष्टÑात पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, सोलापूर या महापालिका आम्ही ताब्यात घेतल्या. आम्हाला कळलेय की कोणाला पकडले की पक्षाचा फायदा होतोे. त्याप्रमाणे आम्ही धोरणे राबविली. या ठिकाणी नवीन मतदारांचा नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास आहे. उत्तर महाराष्ट्रातही नाशिक, जळगाव, धुळे महापालिका आम्ही जिंकल्या आहेत. या राज्यात आता भाजपचा वर्ग तयार झाला आहे.२०१४ मध्ये पक्षाने देशात २८२ जागा व राज्यात २३ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये काय स्थिती राहील?देशात आम्ही ३०० वर जागा जिंकू. पूर्वोत्तर राज्ये, पश्चिम बंगाल, ओडिशा या राज्यांत आम्ही पुढे राहू. देशातील ५४३ मतदारसंघांत नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत, असे समजून लोक मतदान करतील. त्यामुळे पक्षाला ३०० च्या वर जागा मिळतील, असा विश्वास आहे. राज्यात आम्ही ४५ जागा जिंकू.वंचित आघाडी हे तुमच्यासमोर आव्हान आहे का?वंचित आघाडी तयार झाली. कारण दलितांवर काँग्रेसच्या काळात सतत झालेला अन्याय. वंचितांचा आवाज हा काँग्रेसच्या धोरणांविरुद्धचा आहे. आमच्यासमोर त्यांचे आव्हान नाही. उत्तर प्रदेशात मायावतींना आम्ही मुख्यमंत्री केले, कल्याणसिंग मुख्यमंत्री झाले, रामविलास पासवान केंद्रात मंत्री आहेत. महाराष्ट्रात काय? काँग्रेसच्या काळात दलित कार्यकर्ते पुढे आलेच नाहीत. प्रकाश जावडेकर यांना डावलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर केंद्रामध्ये आम्ही रामदास आठवले यांना मंत्रीपद दिले. इथे प्रकाश आंबेडकर दोन वेळा पराभूत झाले. लंडनमध्ये बाबासाहेब राहत होते ते घर आम्ही विकत घेतले. तिथे आता अभ्यासिका तयार करीत आहोत. बाबासाहेबांच्या स्मारकासाठी इंदू मिलची जागा हस्तांतरित केली. महूचे जन्मस्थान विकसित केले. संविधान दिन जाहीर केला, अशी अनेक कामे आम्ही दलित समाजासाठी करीत आहोत. त्यांच्या राजकीय अपेक्षांची पूर्तता आम्ही केली.लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने तुमचा प्रचार कसा चालू आहे?मी पक्षाच्या प्रचारासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत १५ जिल्ह्यांत दौरे केले आहेत. आणखी दहा जिल्ह्यांत प्रचार करणार आहे. माझे राज्यात विविध ठिकाणी ५० सभांचे ‘टार्गेट’ होते. मात्र, आजारपणामुळे काही सभा कमी झाल्या आहेत.बहुचर्चित नांदेड, माढा आणि बारामतीमध्ये काय चित्र राहील?नांदेडमध्ये आम्ही जिंकणार. माढामध्ये काँग्रेसचे जयकुमार गोरे यांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. शिवाय पंतप्रधानांची सभा अकलूजमध्ये झाली आहे, त्याचाही फायदा आम्हाला होईल. बारामतीमध्ये यंदा चांगली लढत होईल.विनायक मेटे आणि महादेव जानकर हे महायुतीमधील नेते नाराज असल्यामुळे पक्षाच्या जागांवर काही फरक पडणार का?ते नाराज नाहीत. जानकर आमच्या प्रचारात आहेत.राज्याची जबाबदारी सांभाळताना तुमच्या मतदारसंघात तुम्ही किती लक्ष देत आहात?मागच्या पाच वर्षांच्या काळात मी मतदारसंघात आयसीटी (इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी) आणले. सहाशे एकर जागेवर सिडकोचा प्रकल्प येतोय. ड्रायपोर्टची उभारणी सुरु झाली आहे. एकंदरीत १६०० एकरवर मी नवीन जालना वसवतोय. मतदारसंघात सुमारे सहा हजार कोटींची रस्त्यांची कामे सुरू आहेत. जालना शहरात पाणीपुरवठा योजना राबविली. मराठवाड्यात सर्वात जास्त निधी माझ्याच मतदारसंघात आलेला आहे. मतदारसंघात माझा सातत्याने असलेला संपर्क आणि मी केलेली कामे यामुळे मला निश्चित यश मिळेल.>तुमच्याकडे प्रचाराचे मुद्दे नाहीत; विरोधकांचे म्हणणेताजी घटना घडते तेव्हा त्याचा उल्लेख होतोच. त्यामुळे देशात एखादी घटना घडली की त्याचे पडसाद उमटतात. ते (विरोधक) ५६ जण एकत्र आले. मात्र आमचा ५६ इंच छातीवाला एकच त्यांच्या बरोबरीचा आहे. असे असले तरी आम्ही मुद्द्यावरच निवडणूक लढवतोय. मागील साडेचार वर्षांत राज्यात शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार कोटी रुपये जमा झाले.काँग्रेसने १५ वर्षांच्या कालावधीत ४५०० कोटी रुपये जमा केले. युरियाचे दर आम्ही पाच वर्षे वाढू दिले नाहीत. जलयुक्त शिवारसारखी योजना आम्ही प्रभावीपणे राबविली. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. हे आमचे मुद्दे आहेत. सर्जिकल स्ट्राइकचे श्रेय आम्ही सैनिकांनाच दिले आहे. पाकिस्तानवर कारवाईचे अधिकार मोदींनी सैन्यालाच दिले होते, हे लक्षात घ्यायला हवे. घर, वीज, टॉयलेट, गॅस, अशा गरिबांच्या कल्याणकारी योजना आम्ही राबविल्या आहेत आणि हेच आमचे मुद्दे आहेत.>काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसमधून नवीन लोक घेतल्यामुळे भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना आहे.आमचे सरकार आल्यामुळे आमची ताकद वाढलेली आहे. काही गोष्टी आम्ही ठरवून केल्या. विखे पाटीलही तसे पक्षात जरा उशिराच आले. फार ‘कमिटमेंट’वर आमच्याकडे कुणी आलेले नाही. पक्षात नव्याने आलेल्या नेत्यांची क्षमता पक्षात जशी वाढेल तसे त्यांना न्याय मिळेल.
'पक्षात घेताना कुणालाही ‘कमिटमेंट’ नाही!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 4:18 AM