गया – शिवसेनेशी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या सगळीकडे अभिनेत्री कंगना राणौत चर्चेत आहे. बिहार निवडणुकीच्या दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, त्यानंतर रिया चक्रवर्ती आणि आता कंगनावर सर्वांचे लक्ष आहे. कंगना राणौत हिच्या बेकायदेशीर कार्यालयाच्या बांधकामावर बीएमसीने हातोडा मारल्यानंतर कंगनानं शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला. तिने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत आव्हान दिलं. त्यानंतर शिवसेना कंगना आणि भाजपा यांच्याविरोधात टीकास्त्र सोडत आहे.
या संपूर्ण घडामोडीत कंगना राणौतला केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देणे असो वा बीएमसीच्या कारवाईवर भाजपाने केलेला विरोध..कंगनाच्या बाजूने भाजपा उभी राहिल्याचं दिसून येते. त्यामुळे बिहार निवडणुकीत कंगना राणौत भाजपासाठी स्टार प्रचारक म्हणून काम करणार अशी चर्चा सुरु आहे. यावर विरोधी पक्षनेते आणि बिहार भाजपाचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला.
यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एनडीएकडे सर्वात मोठे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आम्हाला कोणत्या दुसऱ्या स्टार प्रचारकाची आवश्यकता नाही. कंगना राणौत वारंवार तिच्या राजकीय भूमिकेबद्दल सांगण्यास टाळत आलेली आहे. रविवारी कंगना मुंबईत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना भेटण्यासाठी राज्यपाल भवनात गेली. त्यानंतर ज्यावेळी ती बाहेर आली तेव्हा तिच्या हातात कमळाचं फूल होतं.
कंगनानं सांगितलं की, राजकारणाशी माझं देणंघेणं नाही. माझ्यासोबत जे झालं ते मी राज्यपालांना सांगितले. राज्यपाल हे सरकारचे पालक आहेत. बीएमसीच्या कारवाईबद्दल मी त्यांच्याशी बोलले असं ती म्हणाली. पण बीएमसीच्या कारवाईनंतर कंगनाच्या आईने आम्ही आता पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत अशी प्रतिक्रिया दिली होती.
काय म्हणाली होती कंगनाची आई?
कंगनाच्या मूळ घरी भाजपाचे नेते आणि कार्यकर्ते गेले होते. भाजपाच्या नेत्यांनी कंगनाच्या आई आशा यांना सांगितलं की, आम्ही कंगनासोबत आहोत. तसेच घाबरण्याची आवश्यकता नाही. हिमाचलच्या बेडर मुलीचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही, असे आश्वासन दिले. यावर कंगनाच्या आईने मोदी सरकार आणि हिमाचल सरकाचे आभार व्यक्त केले. ''आमचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत होतो. मात्र, मोदी सरकारने आमचे हृदय जिंकले आहे. यामुळे आता आम्ही पूर्णपणे भाजपाचे झालो आहोत असं आशा म्हणाल्या होत्या.
कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी
कंगनालाही राजकीय पार्श्वभूमी आहे. तिचे पणजोबा सरजू सिंह गोपालपूरचे आमदार होते. त्या आधीपासून त्यांचे कुटुंबीय काँग्रेसी विचारधारेचे समर्थ राहिले आहे. मात्र, कंगना गेल्या काही काळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करते. यामुळे कंगना पुढील काळात भाजपात दिसल्यास आश्चर्य वाटायला नको. तिच्या आईनेही तसेच संकेत दिले आहेत.
कंगनाबाबत शिवसेनेची भूमिका
कंगनाच्या मागे कोणाचा हात आहे, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांच्याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे. मुंबई प्रत्येकाची आहे. मात्र तिला बदनाम करण्याचा हक्क कोणालाही नाही. सध्या कोणता पक्ष काय बोलतोय याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. सत्ता गेलेली मंडळी राज्याबद्दल काय बोलत आहेत, याची नोंद आम्ही ठेवत आहोत. ज्या पोलिसांना नाव ठेवता, माफिया म्हणता, त्याच पोलिसांच्या संरक्षणात फिरता, अशा शब्दांत राऊत यांनी कंगनाला लक्ष्य केलं. तुम्ही ज्या अभिनेत्रीचं नाव घेताय, तिचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे असंही शिवसेनेने स्पष्ट केले आहे.