नवी दिल्ली: गेल्या महिन्यात मुंबई आणि नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्यात तीनवेळा गाठीभेटी झाल्या. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधींची भेट घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. प्रशांत किशोर विरोधकांची मोट बांधत असल्याची चर्चा सुरू झाली. २०२२ मध्ये होत असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार विरोधकांचे उमेदवार असतील, अशा स्वरुपाच्या चर्चांनादेखील उधाण आलं. आता यावर खुद्द शरद पवारांनी स्पष्टीकरण दिलं.
प्रशांत किशोर यांच्यासोबतच्या भेटीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबद्दल चर्चा झाली नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. न्यूज१८ इंडियानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. गेल्या काही दिवसापासून प्रशांत किशोर आणि शरद पवारांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. गेल्या महिन्याभरात त्यांच्यात तीन बैठका झाल्या. मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत किशोर यांनी पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी काम केलं. किशोर यांच्या रणनीतीचा तृणमूलला फायदा झाला. पक्षानं दोनशेहून अधिक जागा जिंकत सत्ता कायम राखली.
शरद पवार यांची तीनदा भेट घेतल्यावर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शरद पवार विरोधी पक्षांचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या. राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करण्याबद्दल प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा झाली का, असा प्रश्न पवारांना विचारण्यात आला. त्यावर तशी कोणताही किशोर यांच्यासोबत झाली नसल्याचं त्यांनी सांगितलं.