- महेश सरनाईकसिंधुदुर्ग : मी बंद खोलीत राजकारण कधी करत नाही. जे करतो ते जाहीरपणे करतो. शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द मी दिला नव्हता, असे सांगतानाच आम्हीही तुमच्या मार्गाने चाललो असतो, तर तुमचा पक्षही संपला असता, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे शिवसेनेवर केली.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पडवे (ता. कुडाळ) येथील लाइफटाइम मेडिकल काॅलेजचे उद्घाटन गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.शहा पुढे म्हणाले, राज्यातील जनतेने भाजप-शिवसेना युतीला दिलेला जनादेश ठोकरून महाविकास आघाडीचे तीनचाकी सरकार बनले आहे. सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आलेल्या तिघांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांंचे सिद्धांत शिवसेनेने सत्तेसाठी तापी नदीत विसर्जित केले आहेत. आम्ही वचनाला जागणारे आहोत. बिहारमध्ये नितीशकुमारांच्या जागा कमी निवडून आल्यानंतर देखील, आधी शब्द दिल्याप्रमाणे त्यांनाच मुख्यमंत्री केले, असेही शहा म्हणाले.निवडणुकीच्या काळात प्रत्येक सभेत शिवसेनेच्याही पोस्टरवर मोदींचा मोठा फोटो होता. तेव्हा आम्ही सगळे सांगत होतो, फडणवीस मुख्यमंत्री बनणार. तेव्हा का विरोध केला नाही, असा सवाल करून शहा म्हणाले, ३७० कलम मोदींनी हटवले, अयोध्येत श्रीराम जन्मभूमीवर मंदिर बनवत आहोत. याचे स्वागत करतानाही शिवसेनेचे नेते दबकत होते.गरिबांना पाच लाखांपर्यंत उपचाराचा खर्च देणारआपण आरोग्य सेवेवर सर्वाधिक भर देत आहोत. ७० वर्षांत मेडिकल कॉलेज बांधले. त्याच्या ५० टक्के केवळ सहा वर्षांत बांधले. २ एम्स होते... आज २२ बांधतो आहोत. मेडिकलच्या जागाही वाढविल्या आहेत. आरोग्य क्षेत्राची तरतूद १३७ टक्के वाढवली आहे. पंतप्रधान जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत योजनेत सामान्यांना, गरिबांना पाच लाखांपर्यंत उपचार खर्च केंद्र देणार असल्याची घोषणाही अमित शहा यांनी केली.भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना त्रास महाराष्ट्रात इतके मोठे वादळ आले, तेव्हा मुख्यमंत्र्यांना कोणी पाहिले का इथे... ? देवेंद्रजी फिरत होते. हे सरकार भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांना त्रास देत आहे; पण आमचे कार्यकर्ते घाबरणार नाहीत, असा टोलाही शहा यांनी लगावला. ‘भारतीय उपचार पद्धती जगाने स्वीकारली’अमित शहा म्हणाले, मोदींच्या नेतृत्वात भारताने कोरोनाशी केलेल्या लढाईचे सगळ्या जगभरात स्वागत होत आहे. याआधी आपल्याकडे व्हेंटिलेटर, मास्क, पीपीई कीट इथे बनत नव्हते. अवघ्या १० महिन्यांत आपण पहिल्या क्रमांकाचे निर्यातदार झालो आहोत. जगभरात कोरोना लस भारत पुरवत आहे. आपण तयार केलेल्या उपचार पद्धतीची दिशा आज जगात स्वीकारली गेली आहे, असेही शहा म्हणाले.
...तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती; अमित शहा यांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 6:55 AM