मुंबई : कोरोनाचे संकट असतानाच मुंबईवर नैसर्गिक आपत्ती येत आहे. प्रचंड पाऊस, दरडीही कोसळत आहेत. जगभरात पूर येत आहेत. नियोजन करून वसविलेल्या बीजिंगची महापालिका काही शिवसेनेच्या ताब्यात नाही. देशभरात जिथे जिथे पूर आले असतील, त्या महापालिकाही आमच्या ताब्यात नाहीत. तिथेही पूर आला. त्याला जबाबदार कोण? असे तिकडचे लोक विचारत असतीलच ना? असा चिमटा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्रातील परिस्थिती संमिश्र आहे. काही ठिकाणी बऱ्यापैकी सुधारली आहे. तर, काही ठिकाणी चिंता करायला लागू नये अशी स्थिती आहे. त्यामुळे काही ठिकाणी निर्बंधात शिथिलता दिली, तर काही ठिकाणी दिली नाही. याचा अर्थ असा नाही की ते कायम बंद राहील. दुकानांच्या वेळांत शिथिलता दिली आहे. इतर गोष्टींनाही शिथिलता मिळेल. पण जबाबदारी घेऊन आणि जबाबदारीचे भान ठेवूनच निर्बंध उठवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. जिथे-जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही, तिथल्या नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी संयम सोडू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.
पालिका कर्मचाऱ्यांनाही जीव आहे. त्यांनाही कुटुंब आहे. पण तरीही कठीण काळात पालिकेने केलेले काम अद्वितीय आहे. मुंबई मॉडेलची जगानेही दखल घेतली. हे आपण करून दाखविले आहे. सर्व जण घरी असताना पालिकेचे कर्मचारी रस्त्यावर होते. ते होते म्हणून आपण रस्त्यावर येऊ शकतो हे त्यांचे आपल्यावर ऋण आहे. संकट फार मोठे होते, अजूनही ते गेलेले नाही, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
जबाबदारीचे भान ठेवूनच लोकलबाबत निर्णय जेथे निर्बंधामध्ये शिथिलता देणे शक्य होते तिथे तसा निर्णय घेतला. याचा अर्थ कोणी लाडका किंवा कोणी दुश्मन असा होत नाही. सर्वांच्या जीवाची काळजी आहे, म्हणूनच अशा गोष्टी कराव्या लागतात. लोकल सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. पण, जबाबदारीचे भान ठेवूनच निर्बंध उठविण्याबाबत निर्णय घेतले जातील, असे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी स्पष्ट केले.
कार्यालय तीन महिन्यांपासून कार्यरत, उद्या गेट वे ऑफ इंडियाचेही लोकार्पण करतील - आशिष शेलारमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरूवारी पालिकेच्या एच-पश्चिम कार्यालयाचे उद्घाटन झाले. पण, १ मे या महाराष्ट्र दिनापासून ही वास्तू लोकांसाठी खुली करण्यात आली. तीन महिन्यांपासून ही वास्तू वापरात आहे. त्यामुळे करून दाखविल्याच्या नादात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्या गेट वे ऑफ इंडियाच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करु नये म्हणजे मिळवले, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली.गुरुवारी लोकार्पण सोहळा पार पडला त्या एच-पश्चिम महापालिका कार्यालयाची जुनी इमारत अपुरी पडत असल्याने स्थानिक आमदार म्हणून सहा वर्षे पाठपुरावा केला. या कार्यालयाचा ठराव मांडून त्यासाठी निधी उपलब्धतेच्या बैठका, त्याचे टेंडर, प्रत्यक्ष काम याबाबत आठवेळा बैठका घेतल्या. या कार्यालयाच्या निर्माणात शिवसेनेचा कुठलाच सहभाग नव्हता. मग श्रेय घेण्यासाठी अट्टाहास कशाला, असा प्रश्न शेलार यांनी केला.nमहापालिकेतील सत्ताधारी श्रेय घेण्याच्या नादात काय करुन दाखवतील, याचा नेम नाही. मुख्यमंत्र्यांना या इमारतीबाबत वास्तव माहिती न देता अशाप्रकारे कार्यक्रम करुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी स्वतःचे हसे तर केलेच सोबत मुख्यमंत्र्यांची फसगत केल्याचे ते म्हणाले.nमुंबई महापालिका श्रेयवादाच्या नादात हे असे जे काही करुन दाखवते आहे, त्याबद्दल खेद वाटतो आहे. मुख्यमंत्री पदाचा सन्मान राखणे आपले कर्तव्य नाही का, केवळ करुन दाखवल्याच्या नादात लोकसेवेत असलेल्या इमारतीचे लोकार्पण रातोरात ठरवून मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणे योग्य आहे का, असा प्रश्न आमदार शेलार यांनी उपस्थित केला आहे.