"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 12:02 PM2024-09-17T12:02:38+5:302024-09-17T12:05:52+5:30

Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले, तर मुख्यमंत्री कोण असेल? अशी चर्चा सुरू आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. 

"Not all wishes come true", what Ajit Pawar said about Chief Minister post? | "सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?

"सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही", अजित पवारांचे मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलले?

Ajit Pawar Mahayuti : विधानसभा जागावाटपाची चर्चा महायुतीमध्ये सुरू आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ८०-९० जागा मिळू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. या चर्चांबद्दल अजित पवारांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना उत्तर दिले. त्याचबरोबर मुख्यमंत्री व्हायचे आहे, पण सर्वांचीच इच्छा पूर्ण होते असे नाही, असे भाष्य अजित पवारांनी यावेळी केले. 

पुण्यातील मानाच्या दगडूशेठ हलवाई गणपतीची पूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आली. पूजा पार पडल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. विधानसभा जागावाटप, मुख्यमंत्रिपद या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केले. 

"जागावाटपाचे काम झाले, पण..."

अजित पवार म्हणाले, "महायुतीचे सरकार आणणे, हे आमचे टार्गेट आहे. त्याकरिता महायुतीतील सगळेच घटक प्रयत्नशील आहेत. त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललो आहोत. जागावाटपाचे बरेच काम झाले आहे. काही थोडेफार आहे, मार्ग नाही निघाला; तर पुन्हा बसू आणि मार्ग काढू", अशी अजित पवारांनी यावेळी दिली.  

महायुतीत ८० ते ९० जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले, "ज्यावेळी मित्रपक्षांसहित सगळ्यांचे जागावाटप होईल, तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेणार आहोत आणि जाहीर करू. त्यावेळी तु्म्हाला समजेल."

मुख्यमंत्रि‍पदाबद्दल अजित पवार काय म्हणाले?

"सगळ्या पक्षांच्या प्रमुखांना मुख्यमंत्रि‍पद मिळावे, असे वाटते. त्या सगळ्यांमध्ये मी देखील आहे. पण, मुख्यमंत्री होण्यासाठी बहुमताचा आकडा गाठावा लागतो. सर्वांचीच इच्छा पूर्ण होते, असे नाही", असे भाष्य अजित पवारांनी केले. 

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?

विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटपाच्या वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांबद्दल चर्चा सुरू आहे. यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. 

"महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी जागावाटपासाठी ८०-९० जागांचा आग्रह धरलेला नाही. जिथे अजित पवार जिंकतील, त्या जागेसाठी त्यांचा आग्रह असेल. जिथे शिंदे सेनेचा उमेदवार जिंकेल, तिथे त्यांचा आग्रह असेल आणि जिथे भाजपाचा उमेदवार जिंकेल, तिथे आमचा आग्रह मान्य करू. आम्ही जिंकण्यासाठी लढण्याचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. आतापर्यंत ७० टक्के जागांवर एकमत झाले आहे", अशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून देण्यात आली आहे.  

Web Title: "Not all wishes come true", what Ajit Pawar said about Chief Minister post?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.