मुंबई : भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजपाने हुकुमशाही सुरु केली असून, खडसेंना ईडीच्या नोटीसीनंतर आता सीडी ही निघणार असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिला आहे.
ईडीने 30 डिसेंबरला हजर राहण्याची नोटीस खडसेंना पाठविल्याचे वृत्त आहे. यावर एकनाथ खडसे यांनी अद्याप नोटीस मिळाली नाही, नोटीस मिळाल्यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता ही नोटीस नेमकी कशासंदर्भात आहे? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचिटचा पुण्यातील भूखंड घोटाळा की आणखी कशाबाबत ते लवकरच स्पष्ट होणार आहे. मात्र, यावरून आता ईडी आणि सीडीचे राजकारण रंगणार आहे.
विधानसभेच्या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठविल्याची ओरड उठली होती. आता खडसेंना पाठविली आहे. उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्यामुळेच केंद्रावकडून हे दबावतंत्र वापरले जात आहे. ज्यादिवशी एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेश केला त्याचदिवशी त्यांनी हे ईडीची नोटीस देतील, असं सांगितलं होतं. पण ते जेव्हा ईडी पाठवतील तेव्हा मी सीडी दाखवेन असे खडसे म्हणाले होते. आता भाजपाने ईडी दाखविली आहे. यामुळे सीडीही निघणार आहे. हुकुमशाहीच्या राजकाराणाला काही अर्थ नाही असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे.
“खडसेंना ईडीची नोटीस येणार हे होणारच होतं. महाराष्ट्रात ज्यांनी भाजप विरोधात मोहिम उघडली, त्यांच्याविरोधात केंद्र सरकारकडून अशा पद्धतीच्या नोटीस दिल्या जाणार आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्नब गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौतविरोधात भूमिका घेतल्याने त्यांना ईडीने नोटीस पाठवली”, असेही मिटकरी म्हणाले.