नवी दिल्ली - पश्चिम बंगालसहीत पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्यात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमध्ये राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. तसेच याच दरम्यान टॉलिवूडच्या काही कलाकारांनी राजकारणाच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांचा अत्यंत जवळचा मित्र असलेल्या यश दासगुप्ता यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या उपस्थिती पक्षात प्रवेश केला आहे. यश दासगुप्तांच्या भाजपात जाण्याने टीएमसीमध्ये खळबळ उडाली आहे.
दासगुप्ता हे तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. त्यामुळे नुसरत जहाँ देखील भाजपामध्ये प्रवेश करणार का याची जोरदार चर्चा रंगली आहे. मात्र आता या सर्व चर्चा नुसरत यांनी फेटाळून लावल्या आहेत. माझी तृणमूलशी बांधिलकी आहे. मी तृणमूलची प्रामाणिक सैनिक आहे, असं नुसरत जहाँ यांनी स्पष्ट केलं आहे. यश दासगुप्ता यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नुसरत जहाँ यांच्या भाजपा प्रवेशाबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. "मी टीएमसीची प्रामाणिक सैनिक आहे आणि आपल्या पक्षासाठी नेहमीच कां करत राहणार आहे" असं नुसरत यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही", नुसरत जहाँ संतापल्या
कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेमोरियल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर भाषण करण्यासाठी जात असताना या घोषणा देण्यात आल्या. त्यामुळे नाराज होत ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या घोषणाबाजीला ममता बॅनर्जी यांनी कडाडून विरोध दर्शविला आहे. यावरून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार आणि अभिनेत्री नुसरत जहाँ यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
नुसरत जहाँ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "रामाचं नाव गळ्यात गळा घालून घ्यायला हवं, गळा दाबून नाही. स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सरकारी कार्यक्रमात अशाप्रकारच्या राजकीय आणि धार्मिक घोषणा देणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करते" असं नुसरत जहाँ यांनी म्हटलं आहे. ममता बॅनर्जी यांनी देखील घोषणा ऐकल्यानंतर कार्यक्रमात काहीही बोलण्यास नकार दिला आहे. मी निषेध म्हणून काहीही बोलणार नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. विशेष म्हणजे, ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आपली नाराजी व्यक्त केली.