नागपूर: ओबीसींची जातनिहाय जनगणना करा, राजकीय व इतर क्षेत्रातील व जिल्ह्यातील आरक्षण पुर्ववत करा, अन्यथा सत्ता सोडा, ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवा अशा मागण्यांसह भाजपाचं आज राज्यभर ठाकरे सरकारविरोधात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पुणे, बीड, नागपूर, चंद्रपूर, औरंगाबाद, नाशिक अशाविविध ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते आणि ओबीसी नेते रस्त्यावर उतरले आहेत.
नागपूरमधील अनेक भागांमध्येही ओबीसी आरक्षणासाठी भाजप कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यान व्हेरायटी चौकात एक वेगळाच प्रसंग पाहायला मिळाला. भाजपच्या मोठ्या बॅनरसमोर युवक काँग्रेसनं स्वत:चा बॅनर फडकावला. विशेष म्हणजे या बॅनरवर काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो नव्हते. तर भाजपमधील आजी-माजी ओबीसी नेत्यांचे फोटो छापण्यात आले होते. त्याखाली जय ओबीसी अशी घोषणादेखील होती.
आपल्या बॅनरवर भाजप नेत्यांचे फोटो लावून युवक काँग्रेसंनं अप्रत्यक्षपणे भाजपमधील ओबीसी नेत्यांचे प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी हे बॅनर जप्त केले. या बॅनरवर भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे, भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे व सुधाकर कोहळे यांचे फोटो होते. जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुर्बानी अशी एक ओळदेखील बॅनरवर होती. युवक काँग्रेसचा हा बॅनर भाजपच्या आंदोलनात लक्षवेधी ठरला.