नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. राष्ट्रपती भवनात ४३ खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यापैकी ४ मंत्रिपदं महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत. त्यात एका कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदांचा समावेश आहे. नारायण राणेंना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे लघु आणि मध्यम उद्योगांची जबाबदारी आहे. कोकणात शिवसेनेसमोर आव्हान उभं करण्यासाठी राणेंना कॅबिनेट मंत्रिपदाच्या माध्यमातून ताकद दिल्याचं बोललं जात आहे. याबद्दल राणेंनी एका मुलाखतीत सविस्तर भाष्य केलं.
शिवसेनेची सत्ता असताना नारायण राणे मुख्यमंत्री होते. त्यानंतर काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी पक्षांतर करत महसूल मंत्रिपद मिळवलं आणि आता भाजपमध्ये जाऊन ते कॅबिनेट मंत्री झाले आहेत. याचा धागा पकडून सत्ता असेल तर तिथे राणे जातात का, असा सवाल राणेंना विचारण्यात आला. त्यावर मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. बाळासाहेब ठाकरेंनी मला कॅबिनेटमंत्री आणि मग मुख्यमंत्री केलं. मी काहीही मागितलं नव्हतं. पण त्यांनी मला दिलं. आजही मी कॅबिनेट मंत्रिपद मागितलं नव्हतं. पण मी पक्षासाठी काम करतो. पक्ष त्याचा विचार करतो. त्यात चुकीचं काही नाही, असं उत्तर राणेंनी दिलं.
बाळासाहेब ठाकरेंनी तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमचं करिअर त्यांनी घडवलं असं तुम्ही वारंवार सांगता. पण इथे आता जवळपास पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहांचे फोटो आहेत. मग बाळासाहेबांचा फोटो का नाही?, असा प्रश्न राणेंना विचारण्यात आला. त्यावर मी बाळासाहेबांचा आदर करतो. त्यांना गुरु मानतो. उद्धव ठाकरेंशी माझं पटलं नाही.. त्यामुळे मी शिवसेना सोडून बाहेर निघालो, असं राणे म्हणाले.
भाजप-शिवसेनेनं हिंदुत्व किंवा आणखी कोणत्या मुद्द्यावरून एकत्र येण्याचा निर्णय घेतल्यास तुम्ही काय करणार?, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. भाजप नेते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. याबद्दल पक्षाचं नेतृत्व जो निर्णय घेईल त्यासाठी आम्ही तयार असू, असं उत्तर राणेंनी दिलं.