लखनऊ: देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता उत्तर प्रदेशमध्ये (UP Election 2022) सर्व पक्षांनी कसून तयारीला सुरुवात केली आहे. यातच आता सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा भाजप आणि योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे. इतकेच नव्हे तर, उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीत भाजपला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले, या शब्दांत राजभर यांनी हल्लाबोल केला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ओमप्रकाश राजभर यांची मनधरणी करण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप नेत्यांनी महिन्यातून तीनवेळा ओमप्रकाश राजभर यांची भेट घेतल्याचेही सांगितले जात आहे. मात्र, एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना ओमप्रकाश राजभर यांनी यंदाची निवडणूक अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षासोबत लढणार असल्याचे म्हटले आहे. पूर्वांचल भागात ओमप्रकाश राजभर यांचा मोठा प्रभाव असून, भाजपची या भागातून पिछेहाट होताना दिसत असल्याचे म्हटले जात आहे. म्हणूनच भाजप आता ओमप्रकाश राजभर यांना आपल्याबाजूने करण्याचा प्रयत्न करत आहे.
BJP ला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले
उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपला ५० पेक्षा जास्त जागा जिंकता आल्या तरी खूप झाले. पूर्वांचल येथील बलिया, मऊ, आझमगड आणि मिर्झापूर यांसारख्या भागात भाजपचा सुफडा साफ होणार आहे. या ठिकाणी भाजपला खातेही उघडता येणार नाही. शेतकरी शेतात दंडुके घेऊन उभे आहेत, असा दावाही राजभर यांनी यावेळी केला आहे.
अखिलेश यादव मुख्यमंत्री होणार
भाजपला जनतेचा कौल मिळणार नाही. अखिलेश यादव मुख्यमंत्री होतील. भाजपवाले भ्रमात आहेत. हिंदू-हिंदू करणारे नकली हिंदू आहेत. व्यापारीही भाजपवाल्यांना कंटाळले आहेत, असेही राजभर यांनी सांगितले. तसेच मंत्री बनणार का, यावर बोलताना राजभर यांनी स्पष्ट केले की, आम्ही सपासोबत जात आहोत. जेवढ्या मोर्चाचे नेते यात सहभाग होत आहेत, त्यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. मीही मंत्री होईन, असे राजभर यांनी नमूद केले.