काॅंग्रेसचा विचारच देशाला वाचवू शकतो - नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 11:09 AM2021-06-10T11:09:32+5:302021-06-10T11:09:37+5:30
Nana Patole : देशाला केवळ काँग्रेसचा विचारच वाचवू शकतो, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कारंजा येथे केले.
कारंजा लाड : काँग्रेस पक्षाचा विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्यांची आहे. देशभरात सध्या कठीण परिस्थिती निर्माण झाली असून, आता देशाला केवळ काँग्रेसचा विचारच वाचवू शकतो, असे प्रतिपादन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा आमदार नाना पटोले यांनी कारंजा येथे ९ जून रोजी आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात केले.
अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, आ.वजाहत मिर्झा, आ.कुणाल पाटील, माजी आ.नातिकोद्दीन खतीब, निरीक्षक अतुल लोंडे, आमदार अमित झनक, जिल्हा निरीक्षक प्रकाश साबळे, जिल्हाध्यक्ष एड. दिलीप सरनाईक, मो.युसूफ पुंजानी, जिल्हा प्रवक्ता दिलीप भोजराज आदींची उपस्थिती होती. नाना पटोले म्हणाले की, कोरोना काळात काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या कामाची शाब्बासकी देण्यासाठी तसेच तिसऱ्या लाटेत करावयाच्या उपाययोजनांच्या आढावा घेऊन शासनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी हा दौरा असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकार सत्तेत आल्यापासून धान्याची भीक देत आहे. द्यायचेच असेल तर पैसे द्यावे. नुकतेच काँग्रेसच्यावतीने राज्यात पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले. केंद्र सरकार पेट्रोलच्या मूळ किमतीवर १८ रुपये प्रती लिटर रस्ते विकासाचा कर घेते. पेट्रोल १०० रुपयांच्या वर गेले असून डिझेलही लवकरच शतक गाठणार आहे. वाजपेयी सरकार ते डॉ. मनमोहनसिंग सरकारपर्यंत १ रुपया रस्ते विकासाचा कर घेतल्या जात होता. त्यावेळी १९ हजार कोटी रुपये केंद्राच्या तिजोरीत जमा होत होते, असे त्यांनी सांगितले.
मोदी सरकारने खासगीकरण करण्याचा सपाटा लावला. शासकीय कंत्राटदारांकडून इस्टिमेट केले जात आहे. रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा घणाघाती आरोपही पटोले यांनी केला. भाजपने ओबीसींचे नुकसान केल्याने त्यांना ओबीसींच्या आरक्षणासाठी मोर्चे काढण्याचा अधिकार नसल्याचेही पटोले म्हणाले.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष रमेश लांडकर, शहराध्यक्ष हमीद शेख यांनी पुढाकार घेतला. संचालन शमीम फरहत यांनी तर आभार अॅड. फिरोज शेकूवाले यांनी मानले.