नवी दिल्ली/पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सध्या प्रचार रंगात आला आहे. दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे ओपिनियन पोल आता समोर येऊ लागले आहेत. आज लोकनीती-सीएसडीएसने प्रसिद्ध केलेल्या ओपिनियन पोलमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ओपिनियन पोलमधील आकडेवारीमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली असून, तेजस्वी यादव यांच्या लोकप्रितेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.समोर आलेल्या आकडेवारीनुसार राज्यातील पुढील मुख्यमंत्रिपदासाठी नीतीश कुमार यांना ३१ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. तर राजद नेते तेजस्वी यादव यांना २७ टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. एनडीएपासून वेगळे होत स्वतंत्रपणे निवडणूक लढवणाऱ्या चिराग पासवान यांना ५ टक्के मतदारांनी पाठिंबा दर्शवला. तर भाजपाचे नेते सुशील कुमार मोदी यांना चार टक्के मतदारांनी पाठिंबा दिला. सर्वेमध्ये ३ टक्के मतदारांनी लालूप्रसाद यादव यांना ३ टक्के मतदारांनी समर्थन दिले. दरम्यान, या सर्वेनुसार नितीश कुमार मुख्यमंत्रीपदासाठी पहिली पसंती असले तरी २०१५ च्या तुलनेत नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेत मोठी घट झाली आहे. दरम्यान, नितीश कुमार यांच्या कारभारावर समाधानी असलेल्या मतदारांच्या संख्येमध्येही मोठी घट सर्वेमध्ये दिसून आली आहे. सर्वेत सहभागी झालेल्या राज्यातील ५२ टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या कारभारावर समाधान दर्शवले. तर ४४ टक्के मतदारांनी नितीश कुमार यांच्या कारभाराबाबत असमाधान व्यक्त केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर ६१ टक्के मतदारांनी समाधान आणि ३५ टक्के मतदारांनी असमाधान व्यक्त केले.दरम्यान, बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. २८ ऑक्टोबर, ३ नोव्हेंबर आणि ७ नोव्हेंबर रोजी बिहारमध्ये मतदान होणार आहे, तर १० नोव्हेंबर २०२० रोजी मतमोजणी होईल. नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाआघाडीमध्ये चुरशीची लढाई अपेक्षित आहे.
opinion poll bihar 2020 : नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेत मोठी घट, तेजस्वी चमकले
By बाळकृष्ण परब | Published: October 20, 2020 8:02 PM