देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा शरद पवारांवर निशाणा; "जाणत्या नेत्याला सगळं माहितेय पण..."
By प्रविण मरगळे | Published: October 20, 2020 10:12 AM2020-10-20T10:12:51+5:302020-10-20T10:16:57+5:30
Devendra Fadanvis on Sharad Pawar News: इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करू शकतं परंतु केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली जाते असं त्यांनी सांगितलं.
उस्मानाबाद – सत्तेत असणाऱ्या तिन्ही पक्षात मतभेद असले तरी केंद्राकडे हात दाखवण्यात एकमत आहे. जबाबदारीतून हात झटकले जातायेत, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्याची गरज आहे. तुम्ही राजकीय भाष्य कराल तर त्याला त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल. मला राजकारण करण्याची गरज नाही, शेतकऱ्यांनाही राजकारण नकोय असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला आहे.
अतिवृष्टी झालेल्या भागात त्यांनी पाहणी केली, त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोरोनामुळे आर्थिक संकट जसं राज्यावर आहे तसं केंद्रावरही आहे. कर्ज काढलं पाहिजे ही शरद पवारांची सूचना योग्य आहे, या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शरद पवारांवर जबाबदारी आहे. शरद पवारांना सगळ्या गोष्टींची माहिती आहे. परंतु सरकारचा बचाव करण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढचं ते बोलतात. शेतकऱ्यांकडे प्रशासनाचे कोणतेही अधिकारी पोहचले नाहीत अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांच्या आहेत. इच्छाशक्ती असेल तर राज्य सरकार मदत करू शकतं परंतु केंद्राकडे बोट दाखवून जबाबदारी झटकली जाते असं त्यांनी सांगितलं.
तसेच जीएसटीबाबत मार्चपर्यंत सर्व अनुदान केंद्राने राज्य सरकारला दिला आहे, राज्याप्रमाणे केंद्रालाही जीएसटी मिळाला नाही, केंद्र सरकार १ लाख कोटींची कर्ज घेऊन राज्याला जीएसटी नुकसान परतावा देणार आहे. तो पैसा राज्याला येणार आहे. परंतु आता राज्य सरकारनं त्वरीत शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. राज्याची कर्ज काढण्याची पत १ लाख २० हजार कोटी आहे, सध्या ५० हजार कोटींचे कर्ज राज्यावर आहे, त्यामुळे आणखी कर्ज काढू शकतो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, आपत्ती परिस्थितीत अतिरिक्त व्यवस्था उभी करायला हवी, कृषी, महसूल खात्यातील अधिकाऱ्यांची यंत्रणा जे फिल्डवर काम करतात त्यांना जबाबदारी दिली पाहिजे. वेगवेगळ्या विभागांना एकत्र केलं तर लवकर शेतकऱ्यांना मदत दिली जाऊ शकते. मी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर कधीही टीका केली नाही, पुलावरून पाहणी केली त्यावर ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. दौरा करा अथवा करू नका, पण शेतकऱ्यांना मदत करा असं सांगत राज्याला तात्काळ मदत द्यावी असं विनंती मी अमित शहांना केली आहे. मी बोललो अथवा मुख्यमंत्री बोलले तरी केंद्र सरकार राज्याला भरघोस मदत करणार आहे. संकटकाळात पक्षपातीपणा करत नाही अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना चिमटा काढला आहे.
आज पत्र दिले अन् उद्या रेल्वे सुरु होत नाही
आज पत्र पाठवाल, उद्या महिलांना लोकल सेवा सुरु करता येत नाही, त्यासाठी नियोजन करावं लागतं, कुठून कुठपर्यंत रेल्वे चालवायची, वेळेचे नियोजन, गर्दीचे नियोजन कसं करायचं हे सगळं राज्य सरकारने माहिती दिली तर निश्चित लोकल सेवा सुरु होईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘लाव रे तो व्हिडीओ’ च्या माध्यमातून टीका
मागील सरकारच्या काळात पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींची मदत जाहीर केली होती, तेव्हा सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजारांची मदत तातडीने करावी अशी भूमिका त्यांनी घेतली होती, अजित पवारांनीही अशाप्रकारे १० हजार कोटींची मदत तोकडी आहे, ही मदत कोणाला पुरणार आहे? असं सांगितलं होतं, देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जुने व्हिडीओ दाखवत त्यांनी केलेल्या घोषणा पूर्ण करण्याची संधी आहे असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.