विरोधकांकडून लोकसभा अध्यक्षांवर कागदाची उधळण, 10 खासदारांवर निलंबनाची कारवाई ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 04:08 PM2021-07-28T16:08:01+5:302021-07-28T16:08:08+5:30
Parliament Monsoon Session: लोकसभेत 12 वाजेच्या सुमारास काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांवर कागद उडवले.
नवी दिल्ली:संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून पेगॅससच्या माध्यमातून झालेल्या कथित हेरगिरीचा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आहे. पॅगेससवरून चर्चेची मागणी करत विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज अनेकदा तहकूब करण्यात आलंय. घोषणाबाजीसह आज सकाळी तर काही सदस्यांनी थेट अध्यक्षांवरच कागदांची उधळण केली. त्यामुळे या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज 12 वाजेच्या सुमावार लोकसभेत विरोधकांनी पेगासस हेरगिरी प्रकरणावरुन प्रचंड गोंधळ घातला. सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत काही खासदारांनी लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीजवळ आणि पत्रकारांच्या दालनाजळ जाऊन कागद फाडून उडवले. त्यांच्या या कृत्यामुळे आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. सरकार त्यांच्या निलंबनासाठी आज प्रस्ताव मांडेल.
याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर म्हणाले की, संसदेत आपले मुद्दे उचलले जातील, असा विश्वास जनतेला असतो. पण, आज काँग्रेस आणि टीएमसीच्या खासदारांनी संसदेची मर्यादा तोडली. पत्रकारांच्या दालनात कागद फेकणे ही लोकशाहीसाठी लज्जास्पद बाब आहे. अनुराग ठाकूर यांच्यासह सत्ताधारी पक्षाच्या इतर सदस्यांनीही या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपा खासदार रामकृपाल यादव म्हणाले की, विरोधक संसदेत गुंडगिरी करत आहेत. सरकार संसदेत प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे पण, विरोधी खासदार समाजकंटकांप्रमाणे संसदेत वर्तन करत आहेत.
राहुल गांधींसह विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक
दरम्यान, आज विरोधी पक्षातील नेत्यांनी संसदेतील चेम्बरमध्ये महत्त्वपूर्ण बैठक घेऊन पेगासस विषयावर चर्चा केली. शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही या बैठकीला उपस्थित होते. त्यानंतर विरोधकांनी संसदेबाहेर पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले. पेगॅससच्या माध्यमातून करण्यात आलेली हेरगिरी म्हणजे देशद्रोहच असल्याचं म्हणत काँग्रेस खासदार राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट निशाणा साधला.