पुढील लोकसभेसाठी विरोधकांनी एकत्र यावे, काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 06:28 AM2021-08-21T06:28:05+5:302021-08-21T06:28:34+5:30
Sonia Gandhi : काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांच्या शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या.
- व्यंकटेश केसरी
नवी दिल्ली : स्वातंत्र्य चळवळीने देशाला दिलेली मूल्ये मानणारे सरकार २०२४च्या लोकसभा निवडणुकांनंतर सत्तेवर आणायचे आहे, असा निर्धार करून बिगरभाजप पक्षांनी आपली धोरणे आखावीत, असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले आहे. हे ध्येय आपण एकजुटीने साध्य करू. त्याशिवाय आपल्याकडे अन्य पर्यायही नाही, असेही त्या म्हणाल्या.
काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांच्या शुक्रवारी घेतलेल्या बैठकीत सोनिया गांधी बोलत होत्या. केंद्र सरकारने सहकार हे नवीन खाते स्थापन करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्या खात्याची जबाबदारी दिली आहे. केंद्राची ही कृती म्हणजे राज्यांच्या व राज्य सरकारांच्या अधिकारात ढवळाढवळ आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले होते.
बिगरभाजप राज्यांना लसपुरवठा करण्यात केंद्र सरकार पक्षपात करीत आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याचाही उल्लेख सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात केला.
सोनिया गांधी म्हणाल्या की, सार्वजनिक महत्त्वाच्या व तातडीच्या विषयांवर संसदेमध्ये चर्चा न करण्याचा अत्यंत उद्धट पवित्रा केंद्र सरकारने घेतला. त्यामुळे संसदीय पावसाळी अधिवेशन अक्षरश: वाया गेले. या अधिवेशनात विरोधकांनी दाखविलेली एकजूट संसदेच्या आगामी अधिवेशनांमध्येही कायम ठेवावी, असे आवाहन काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले.
बसप, सप बैठकीला अनुपस्थित
२० बिगरभाजप पक्षांची संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर झालेली पहिलीच बैठक आहे. या बैठकीत समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष यांनी हजेरी लावली नव्हती. मात्र देशातील इतर प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावल्याने विरोधी आघाडीची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
२०२४ जिंकण्यासाठी २० विरोधी पक्षांची बैठक
काँग्रेससह २० बिगरभाजप पक्षाच्या नेत्यांशी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुक अब्दुल्ला, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव, काँग्रेस नेते राहुल गांधी आदी नेते हजर होते.
लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या पक्षांनी एकत्र यावे : शरद पवार
देशापुढील सर्व समस्या सोडविण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे सेक्युलर विचारसरणी व लोकशाहीवर विश्वास असलेल्या सर्व पक्षांनी सध्याच्या स्थितीचा विचार करून एकत्र येण्याची गरज आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बिगरभाजप पक्षांच्या बैठकीत सांगितले.
ते म्हणाले की, सर्व प्रश्नांवर
एकत्रितरीत्या चर्चा करण्याऐवजी प्राधान्यक्रमाने एकेक प्रश्न घेऊन तो सोडवूया. त्यातून देशाला उत्तम भवितव्य देण्याचा प्रयत्न करूया, असेही आवाहन शरद पवार यांनी केले.
बिगरभाजप पक्षांची आघाडी स्थापन व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती.