नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल (Kapil Sibal) यांनी सोमवारी आपल्या दिल्लीस्थित निवासस्थानी विरोधी पक्षांच्या नेत्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले होते. ही डिनर पार्टी कपिल सिब्बल यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती. मात्र या पार्टीला विरोधी पक्षांचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सूत्रांच्या म्हणण्यानुसार या डिनर पार्टीमध्ये काँग्रेसला पुन्हा उभे करण्यासाठीच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. तेव्हा काही नेत्यांनी गांधी कुटुंबीयांना नेतृत्वाच्या ओझ्यामधून मुक्त ठेवण्याचा सल्ला दिला. उल्लेखनीय बाब म्हणजे या डिनर पार्टीला गांधी कुटुंबीयांपैकी कुणीही उपस्थित नव्हते. (Opposition's dinner diplomacy at Kapil Sibal's residence, again questioned by Gandhi family leadership)
गेल्या वर्षी काँग्रेसमधील ज्या २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. त्यामध्ये कपिल सिब्बल यांचाही समावेश होता. या नेत्यांचा राजकीय वर्तुळात जी-२३ असा उल्लेख केला जातो. या नेत्यांनी २०१४ मध्ये सत्तेतून बाहेर गेल्यापासून काँग्रेसच्या झालेल्या दुरवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती. सिब्बल यांच्या या डिनर पार्टीमध्ये पी. चिदंबरम, शशी थरूर आणि आनंद शर्मा यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. या तिघांचाही जी-२३ नेत्यांच्या गटात समावेश होता. तर विरोधी पक्षांमधील राजदचे लालूप्रसाद यादव, सपाचे अखिलेश यादव, शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे शरद पवार, तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, नॅशनल कॉन्फ्रन्सचे ओमर अब्दुल्ला हेही उपस्थित होते. याशिवाय अकाली दलालाही बैठकीस निमंत्रित करण्यात आले होते. डिनरमध्ये नरेश गुजराल हे उपस्थित होती. तर नवीन पटनाईक यांच्या बीजू जनता दल पक्षाचे पिनाकी मिश्रा उपस्थित होते.
यावेळी कपिल सिब्बल यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली. केंद्रातील मोदी सरकारने प्रत्येक संस्था कशी नष्ट केली, याची उदाहरणे दिली. तसेच सर्व विरोधी पक्षांनी एकाग्रतेने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. ओमर अब्दुल्ला म्हणाले की, काँग्रेस मजबूल झाली तर विरोधी पक्ष मजबूत होईल, मात्र काँग्रेसचा मजबूत करण्यासाठी काय उपाय केले जात आहेत. तर जोपर्यंक काँग्रेस पक्ष कुटुंबाच्या विळख्यातून सुटत नाही तोपर्यंत काँग्रेला मजबूत करणे कठीण आहे, असे अकाली दलाचे नरेश गुजराल म्हणाले.
तर लालू प्रसाद यादव यांनी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाला हटवण्याचे आवाहन केले. तर पी. चिदंबरम यांनी काँग्रेसला राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांसोबत मिळून भाजपाविरोधात संयुक्त मोर्चा उभा करण्याचे आवाहन केले. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी याची सुरुवात झाली असल्याचे संकेत दिले आहे. यावेळी पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सर्व विरोधी नेत्यांनी अखिलेश यादव यांना शुभेच्छा दिल्या.