पुणे - बाळासाहेब ठाकरेंनी मला शिवसेनेत नेता करून जमाना लोटला, सामना संपादक होऊन तीन दशकं झाली तरी मी अजूनही शिवसैनिक आहे, शिवसैनिकाला वय नसतं, पण आता काळ बदलला आहे, म्हणून मी ठाकरे सिनेमा निर्माण केला, नव्या पिढीला बाळासाहेब ठाकरे कसे होते ते कळावं, आम्ही त्यांच्यासोबत कसा संघर्ष केला ते समजावं, असा प्रयत्न माझा आहे असं विधान शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले की, मी गेल्या ३० वर्षापासून सामनाचं संपादक पद सांभाळतो, त्याआधीपासून शिवसेनेशी जोडलो आहे, राजकारणात कोणतंही पद मिळावं म्हणून आलो नाही, मराठी माणसासाठी ही शिवसेनेची चळवळ उभी राहिली, ही चळवळ महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न केले, राजकारणात कोणीही ठरवून आलो नाही, जे ठरवून आले ते टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक नाहीत ते खुर्च्या बदलत असतात त्याने काही साध्य होत नाही असं त्यांनी सांगितले.
"...म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा अपमान"; संजय राऊतांची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका
तसेच पक्षात येणाऱ्यांना पदं दिली जात आहेत, त्यामुळे मूळ शिवसैनिक नाराज असल्याचं दिसतं या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणतात की, मूळ शिवसैनिक असा काही वाद नाही. शिवसैनिक हा शिवसैनिक आहे. उदय सामंत यांना शिवसेनेत येऊन १० वर्ष झालं, शंकरराव गडाख राजेंद्र यड्राववकर हे निवडणुकीत आले, पण त्यांनी निवडून येण्यासाठी शिवसेनेचा पाठिंबा घेतला होता, आता शंकरराव गडाख यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे तर येड्रावकर सहयोगी सदस्य आहेत, कधीकधी राजकारण आणि सत्ता स्थापनेची गरज असते त्यातून असे निर्णय घेतले जातात. मूळात सत्ता येणे महत्त्वाचे आहे, सत्ता येण्यासाठी ज्यांचा हातभार लागला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता असण्याचा प्रश्न नाही, मूळात शिवसैनिक हा शिवसैनिक आहे, सगळेच मूळ आहेत असं राऊत म्हणाले.
काही लोकांमध्ये ठाकरे सरकार पंधरा दिवसांत कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या..! "
शिवसेनेला कोणीही हिंदुत्व शिकवू नये
आमचं हिंदुत्व राजकीय नाही, घंटा बडवली अने शेंडी ठेवली म्हणजे हिंदुत्व नाही. शिवसेनेची चळवळ मराठी माणसाची जोडली आहे. आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून आलो नाही, ही चळवळ वाढली पाहिजे, महाराष्ट्राच्या गावागावात पोहचली पाहिजे यासाठी आम्ही काम केले. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, आजही आक्रमकपणे आम्ही हिंदुत्व मांडतो, एक वर्षापूर्वी आमच्या हिंदुत्वावर भाजपला शंका नव्हती, राजकारणात जे ठरवून येतात ते कधी टिकत नाही, विचारांशी प्रामाणिक राहा, विचार बदलल्याने काही साध्य नाही. बाळासाहेब ठाकरे कसे निर्माण झाले हे नव्या पिढीला कळावं म्हणून ठाकरे सिनेमा काढला, सत्ता येण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता नाही, आता सगळेच मूळ शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे नेहमी विरोधकांचे ऐकायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायचे, हीच परंपरा महाराष्ट्राची आहे, काँग्रेस असो शरद पवार असो सगळ्यांनी ही परंपरा कायम राखली आहे, संवाद राखणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाचा वापर केला नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो असं संजय राऊत म्हणाले.