नवी दिल्ली - हवामान बदलासारख्या विषयांवर काम करणारी ग्रेटा थनबर्ग ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. काही दिवसांपूर्वी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ट्वीट करत तिने समर्थन दिलं होतं. तिच्या ट्वीटनं अनेकांचं लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावर काही जणांनी तिच्या ट्वीटचा विरोध केला तर काहींनी तिच्या ट्वीटचं समर्थन केल्याचं पाहायला मिळालं होतं. तिच्या ट्वीटवरून वाद सुरू असतानाच काँग्रेसने मोदी सरकारला सवाल केला आहे. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारला "18 वर्षीय मुलीला आपण शत्रू मानावं इतका आपला देश कमकुवत आहे का?" असा प्रश्न विचारला आहे.
लोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ग्रेटा थनबर्ग वरून निशाणा साधला आहे. "सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यासारख्या व्यक्तींना भरकटवलं जात आहे. आपला देश एवढा कमकुवत आहे का? की विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलल्याबद्दल 18 वर्षीय मुलीला (ग्रेटा थनबर्ग) आपल्याकडे शत्रू मानलं जात आहे?" असा प्रश्न त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे. यापूर्वी पॉप सिंगर रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनी भारतात सुरू असलेल्या कृषी आंदोलनावर वक्तव्य केलं होतं. त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून त्यावर उत्तरही देण्यात आलं होतं.
"जर तुम्ही लोकशाहीचा सन्मान करू शकत नसाल तर..."; ग्रेटा थनबर्गनंचं पुन्हा एक ट्वीट
रिहानानंतर आता स्विडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिनंही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. आम्ही भारतातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी एकजुटीने उभे आहोत, असं तिनं म्हटलं होतं. ग्रेटाने पुन्हा एकदा एक ट्वीट केलं आहे. यामध्ये तिनं विज्ञान आणि लोकशाही एकमेकांशी जोडलं गेल्याचं म्हटलं. "विज्ञान आणि लोकशाही एकमेकांशी जोडलेले आहेत. कारण हे दोन्ही बोलण्याचं स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, तथ्य आणि परदर्शकतेवर आधारित आहे. जर तुम्ही विज्ञानाचा आदर केला नाही तर तुम्ही लोकशाहीचाही आदर करू शकणार नाही. तसंच जर तुम्ही विज्ञानाचा आदर केला नाही तर तुम्ही लोकशाहीचा आदर करू शकणार नाही," असं ट्वीट ग्रेटा थनबर्गनं केलं आहे. यापूर्वी अभिनेते प्रकाश राज यांनी ग्रेटा थनबर्गच्या ट्वीटचं समर्थन केलं होतं. आता त्यांनी तिचं हे नवं ट्वीट लाईकदेखील केलं आहे.
"जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी 3-4 उद्योजक मित्रच देव", राहुल गांधींचा घणाघात
राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे. "जवान नाही, शेतकरीही नाही, मोदी सरकारसाठी 3-4 उद्योजक मित्रच देव आहेत" असं म्हणत राहुल यांनी जोरदार टीका केली आहे. अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शन कपातीच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्रीय अर्थसंकल्पावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. हा अर्थसंकल्प शेतकरी व जवानांच्या हिताचा नसून फक्त उद्योजकांच्या फायद्याचा असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "अर्थसंकल्पात सैनिकांच्या पेन्शनमध्ये कपात. जवानही नाही, शेतकरीही नाही मोदी सरकारसाठी तीन-चार उद्योजक मित्रच देव आहेत" असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.