“हे तर आमचं ३२ वर्षापूर्वीचं स्वप्न”; योगी सरकारच्या फिल्म सिटी प्रकल्पावर काँग्रेसचा पलटवार
By प्रविण मरगळे | Published: September 20, 2020 05:11 PM2020-09-20T17:11:05+5:302020-09-20T17:15:11+5:30
नोएडाच्या फिल्मसिटीमध्ये आता पूर्वीसारखी जागा शिल्लक नाही अशा परिस्थितीत खरोखर तिथे प्रकल्प सुरु करणार की भाजपाची फक्त घोषणाबाजी आहे हे पाहावे लागेल असा टोला काँग्रेस नेत्याने लगावला आहे.
प्रयागराज - यूपीच्या योगी सरकारने राज्यात देशातील सर्वात मोठी फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली आहे, पण या घोषणेवरून आता वादही निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजपा आणि विरोधी काँग्रेसनं यावरुन राजकारण सुरू केले आहे. यूपीमध्ये फिल्मसिटी प्रकल्प हा काँग्रेसचा असून भाजपा विनाकारण यात घोषणा करुन श्रेय लाटत आहे असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार प्रमोद तिवारी यांनी केला आहे.
याबाबत प्रमोद तिवारी म्हणाले की, जवळपास ३२ वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशात वीर बहादुर सिंग यांच्या नेतृत्वात जेव्हा कॉंग्रेसचे सरकार होते तेव्हा नोएडामध्ये फिल्मसिटीचा प्रकल्प सुरू झाला होता. त्यावेळी तत्कालीन सीएम वीर बहादूर आणि फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत नोएडा येथे झालेल्या समारंभात उपस्थित होते. कॉंग्रेसच्या सरकारमध्ये गेल्यानंतर सपा-बसपा आणि भाजपाने उत्तर प्रदेशात सरकार स्थापन केले. परंतु या प्रकल्पाशी संबंधित कॉंग्रेसच्या नावामुळे ते अंमलात आणण्यात काही रस दाखवला नाही असा आरोप केला.
तसेच प्रमोद तिवारी यांच्या म्हणण्यानुसार नोएडाच्या फिल्मसिटीमध्ये आता पूर्वीसारखी जागा शिल्लक नाही अशा परिस्थितीत खरोखर तिथे प्रकल्प सुरु करणार की भाजपाची फक्त घोषणाबाजी आहे हे पाहावे लागेल. यूपीच्या निवडणुकीसाठी आता एक वर्ष बाकी आहे. कोणत्याही प्रकल्प अंमलबजावणी करण्यास सरकार सक्षम नाही. भाजपाचे खासदार रवी किशन आणि मनोज तिवारी यांनीही अशी घोषणा केली, पण ती कागदोपत्रीच राहिली असा टोलाही काँग्रेसने लगावला.
चुकीचं केलं असेल तर शिक्षा मिळावी
चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यावर अभिनेत्रीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. यावर कॉंग्रेसचे नेते व माजी खासदार प्रमोद तिवारी यांनी म्हटलं आहे की, सध्या बॉलीवूडमध्ये जे काही घडत आहे, संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीची प्रतिमा खराब होत आहे. ही घटना पाच ते सहा वर्ष जुनी असेल तर आता ही गोष्ट का बाहेर काढली जातेय? जर एखाद्याने चूक केली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, परंतु यामुळे संपूर्ण उद्योगाची बदनामी होऊ नये.
फिल्म इंडस्ट्रीची प्रतिमा बिघडली
सुशांत सिंह राजपूत - रिया चक्रवर्ती आणि कंगना रणौतनंतर आता अनुराग कश्यपवरील गंभीर आरोप खूपच धक्कादायक आहेत. या सर्व प्रकरणात दोषींवर कारवाई झाली पाहिजे. लोक चित्रपट कलाकारांना त्यांचा आदर्श मानतात. लाखो कुटुंबाचं पोट इंडस्ट्रीवर चालतं. अशा परिस्थितीत अंमली पदार्थ आणि लैंगिक शोषणासारख्या गोष्टी इथल्या सन्मानाचा विनाश करणार आहे. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्री विकृत होऊ शकत नाही असंही प्रमोद तिवारी यांनी सांगितले.
कंगनानं केलं योगी आदित्यनाथ यांच्या निर्णयाचं कौतुक
योगी आदित्यनाथ म्हणाले की, देशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज आहे. उत्तर प्रदेशात एक चांगली फिल्म सिटी तयार केली जाईल. फिल्स सिटीद्वारे निर्मात्यांना पर्याय दिले जातील. कंगनाने योगी आदित्यनाथ यांच्या या निर्णयाच स्वागत केलंय. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बदलाची गरज आहे. लोकांचा असा समज आहे की भारतातील टॉप फिल्म इंडस्ट्री हिंदी फिल्म इंडस्ट्री आहे. पण असं नाहीये. टॉप पोजिशनवर तेलुगू फिल्म इंडस्ट्री आहे. 'मी योगी आदित्यनात यांच्या या निर्णयाचं स्वागत करते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बदलाची गरज आहे. सर्वातआधी आपल्याला एक अशी मोठी फिल्म इंडस्ट्री हवी आहे जिला भारतीय फिल्म इंडस्ट्री म्हटलं जाईल. आपण अनेक गोष्टींमध्ये विभागले गेलो आहोत. ज्याचा फायदा हॉलिवूडला मिळतो. एक इंडस्ट्री, पण अनेक फिल्म सिटीज असं तिने म्हटलं आहे.