नवी दिल्ली – कोरोना काळात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू न झाल्याचं केंद्र सरकारनं संसदेत सांगितलं. केंद्र सरकारच्या या विधानावरून देशभरात विरोधकांनी मोदी सरकारला लक्ष्य केले. आता काँग्रेसकडून संसदेत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांवर विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस देण्यात आली आहे. काँग्रेसचे महासचिव के.सी वेणुगोपाल यांनी गुरुवारी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्याविरोधात राज्यसभेत विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस दिली आहे.
के. सी वेणुगोपाळ (KC Venugopal) यांनी म्हटलंय की, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन (Oxygen) अभावी एकही मृत्यू झाला नाही ही चुकीची माहिती देऊन राज्यसभा सभागृहाची दिशाभूल केली आहे. सभागृहात चुकीची माहिती दिल्याप्रकरणी आरोग्य राज्यमंत्र्यांवर विशेषाधिकार हक्कभंगाची नोटीस दिली आहे. देशात ऑक्सिजनच्या अभावामुळे अनेक लोकांचा जीव गेला हे सगळ्यांना माहिती आहे. तरीही मंत्री अशाप्रकारे विधान करून सभागृहाची दिशाभूल करत आहेत. हा आमच्या अधिकारांचा भंग आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच पुढील कार्यवाहीसाठी ही हक्कभंगाची नोटीस विशेषाधिकारी समितीकडे पाठवण्यात यावी अशी सभापतींना विनंती आहे असं के.सी वेणुगोपाल यांनी सांगितले. केंद्र सरकारने मंगळवारी राज्यसभेत एका लिखित प्रश्नाच्या उत्तरात कोविड १९ महामारीच्या दुसऱ्या लाटेत कोणत्याही राज्यात अथवा केंद्रशासित प्रदेशात ऑक्सिजन अभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नाही. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या की, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड १९ च्या मृत्यूबाबत माहिती देण्याचे आदेश दिले आहेत.
सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी नियमितपणे केंद्र सरकारकडे कोविड १९ मुळे झालेले मृत्यू संख्येची माहिती द्यावी. सध्यातरी देशात ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती नाही. शिवसेना खासदार संजय राउत (Sanjay Raut) यांनीही केंद्र सरकारच्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर, दुसरीकडे नेटीझन्सनेही सरकारला धारेवर धरले आहे. त्यातच, भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा जुना व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, देशात ऑक्सीजनअभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.