“महाविकास आघाडीचं सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय; हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही”
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 10:02 AM2021-04-15T10:02:15+5:302021-04-15T10:05:28+5:30
हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे.
पंढरपूर – आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. अशातच सरकार कधी बदलायचं माझ्यावर सोडा, असं विधान भाजपा नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. या विधानावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जोरदार प्रतिटोला लगावला आहे.(Ajit Pawar Target BJP Devendra Fadnavis in Pandharpur election campaigning)
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राजकारणात कोणी मित्र किंवा शत्रू नसतो. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडणं म्हणजे खेळ वाटतो का? हे सरकार पाडणारा अजून जन्माला यायचाय, हे कोणा येरा गबाळ्याचं काम नाही अशा शब्दात अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना फटकारलं आहे. पंढरपूरच्या शिवाजी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला पहिल्यांदाच थेटपणे अजित पवारांनी उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस त्यांच्या सभेत अजितदादांची नक्कल केली होती. त्यावरून आपण कोणाच्या भानगडीत नसतो. त्यामुळे आपला नाद कोणी करायचा नाही आणि केलाच तर...असं म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे इशाराच दिला. फडणवीसांनी पावसात सभा घेतलेल्याचाही अजितदादांनी समाचार घेतला. तुम्ही कुठे अन् साहेब कुठे असं सांगत अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवली.
देवेंद्र फडणवीसांचे विरोधी पक्षनेते पद तरी 5 वर्षे टीकेल का?
भाजपाने ५ वर्षे राजकारण केले, भारत भालके काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपाने २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो, असा सांगावा फडणवीस आज करत आहेत. मात्र, मोदींनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटी परतावा अद्याप दिला नाही, मग इतर मागण्यांचे काय? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विचारला
त्याचसोबत भाजपा प्रचार करताना सांगतंय की, आम्हाला भारत भालकेंबद्दल आदर आहे. भाजपाला भारत नानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे?. भाजपाकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नाही म्हणून अनेक जण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता मला प्रश्न पडला आहे की देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? असा टोला जयंत पाटलांनी फडणवीसांना लगावला.