मुंबई - पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Pandharpur Election Results ) भाजपाचे समाधान अवताडे यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांना पराभूत केले होते. मात्र पंढरपूरमधील हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपा उमेदवार समाधान अवताडे (Samadhan awatade) आणि विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ("BJP candidate Samadhan awatade misappropriates for victory, hold re-election in Pandharpur," NCP demands)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अॅड. नितीन माने यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात ते लिहितात की, विधान परिषद आमगार प्रशांत परिचारक आणि भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांच्या कारखान्यात कार्यरत असलेले सर्व सभासद आणि कर्मचाऱ्यांनी तीन दिवस डांबून ठेवून भाजपाला मतदान करा अन्यथा कामावरून काढून टाकू, अशा धमक्या दिल्याचा संशय निर्माण होत आहे.
दरम्यान, असा प्रकार झाल्याचा संशय असल्याने मी पत्राद्वारे काही मागण्या करत आहे. प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे यांच्या कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या आणि घरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. दोन्ही नेत्यांचे फोन संभाषण रेकॉर्डिंग तपासण्यात यावे. समाधान अवताडे यांच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे पूर्ण ऑडिट तपासण्यात यावे. निवडणुकीदरम्यान प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे हे संचालक असलेल्या सर्व संस्था, कारखान्यातील आणि कंस्ट्रक्शन कंपनीच्या सर्व बँक खात्यांची चौकशी करावी.
तसेच माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून सदर निवडणुकीची चौकशी करण्यात यावी. तसेच समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक पारदर्शक पद्धतीने घेण्याात यावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे. आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये भाजपाने समाधान अवताडे तर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी भगिरथ भालके यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र