पंढरपूर – राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पंढरपूरच्या निकालानं धक्का बसला आहे. याठिकाणी भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे ३७ व्या फेरीनंतरही आघाडीवर आहेत. त्यामुळे जवळपास भाजपा उमेदवाराचा विजय निश्चित मानला जात आहे. पंढरपूर विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे भगिरथ भालके निवडणुकीच्या रिंगणात होते. भारत भालके यांच्या निधनामुळे याठिकाणी पोटनिवडणूक झाली.(BJP Chandrakant Patil Reaction on Pandharpur By Election Result, Targeted on NCP Jayant Patil)
या निवडणुकीबाबत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, मंगळवेढा-पंढरपूरमध्ये भाजपाचा स्पष्ट विजय झाला आहे. वीज कनेक्शन कापणे, कोविड काळात अनेकांना पॅकेज नाही. पीकविमा नाही, त्यामुळे लोक निवडणुकीची वाट पाहत होते. राज्यातील जनतेच्या मनात महाविकास आघाडी सरकारविरोधात राग आहे. याची दखल राज्य सरकारला घ्यावी लागेल असं त्यांनी सांगितलं
त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं नाव न घेता चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला. पंढरपूरात करेक्ट कार्यक्रम झाला. दुसऱ्याचे शब्द वापरणं मला आवडत नाही. पंढरपूरमध्ये कार्यकर्ते नीट कामाला लागले तर काय होऊ शकतं हे दिसून आलं. तसेच प्रशांत परिचारक आणि समाधान आवताडे यांची घट्ट एकी झाल्याने हा निकाल लागला असल्याचं श्रेय चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्ते आणि परिचारक आवताडे यांच्या एकीला दिलं.
पश्चिम बंगालप्रमाणे इतर राज्यांचेही निकाल दाखवा
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. येथे भाजपाला रोखण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले होते. बंगालमध्ये एकेकाळी निर्विवाद सत्ता राखणारे डावे आणि जास्त जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचे संख्याबळ मर्यादित राहिलेले दिसते. बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूल काँग्रेससोबच अघोषित आघाडी केल्याचे दिसून आहे. काँग्रेस आणि डाव्यांनी आपली मते तृणमूलच्या पारड्यात टाकली, त्यामुळे भाजपाच्या जागा कमी झाल्या असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. त्याचसोबत पश्चिम बंगालमध्ये ३ वरून १०० च्या जवळ पोहचलो. भाजपा देशातला प्रभावी पक्ष आहे. त्याच्याशी लढण्यासाठी सगळे एकत्र येतात असंही पाटील म्हणाले.