पंढरपूर - संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाचे समाधान अवताडे यांनी विजय मिळवला. (Pandharpur Election Results )अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगिरथ भालके यांचा ३ हजार ५०३ मतांनी पराभव केला. या विजयानंतर समाधान अवताडे यांनी हा विजय जनतेला समर्पिक केला आहे. (This victory belongs to the people, Samadhan Avtade's reaction after the victory)
पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत विजयी घोषित करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना समाधान अवताडे म्हणाले की, या निवडणुकीत लोकांची तादक आमच्या पाठीशी होती. हा विजय जनतेचा आहे. निवडणुकीदरम्यान, महाविकास आघाडीकडून जनतेवर दबाव होता. महाविकास आघाडीने अनेक गोष्टींचा वापर केल्याने माझे मताधिक्य कमी झालं आहे, असेही अवताडे यांनी सांगितले.
दरम्यान पंढरपूरच्या तुलनेत मंगळवेढ्यामधून कमी मताधिक्य मिळालं का, असं विचारलं असता दोन्ही तालुक्यांमधून आपल्याला मताधिक्य मिळाल्याचे सांगितले. तसेच या विजयामागे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या इतर अनेक नेत्यांचे योगदान आहे. त्यांनी साथ दिल्याने हा विजय झाला, असे अवताडे यांनी सांगितले.
आता पंढरपूरप्रमाणेच महाराष्ट्रातही करेक्ट कार्यक्रम होणार का, असे विचारले असता याबाबत देवेंद्र फडणवीसच उत्तर देतील, असेही त्यांनी सांगितले. आमदार म्हणून काम करताना पाणी आणि रोजगाराचे मुद्दे प्राधान्याने हाताळले जातील. ३५ गावांचा पाणी प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले जाईल, असे समाधान अवताडे यांनी सांगितले.