नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट न केल्यामुळे नाराज समर्थकांनी दिलेल्या राजीनाम्यांच्या पार्श्वभूमीवर नेत्या पंकजा मुंडे यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची येथे भेट घेतली.
मोदी सरकार-२ च्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या आणि पंकजा मुंडे यांची भगिनी प्रीतम मुंडे यांचा समावेश होणार अशी चर्चा होती. तो न झाल्यामुळे नाराज मुंडे समर्थकांनी मोठ्या संख्येने राजीनामे दिले. रविवारी पंकजा मुंडे भाजपच्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी येथे आल्यावर त्या केंद्रीय नेतृत्वापुढे प्रीतम मुंडेबद्दलची आपली बाजू मांडतील, असे म्हटले जात होते. तथापि, त्यांनी आधीच स्पष्ट केले होते की, बहिणीला मंत्रीपद न मिळाल्यामुळे ती आणि तिचा परिवार नाराज नाही.
पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, आम्ही कधीही मंत्रीपदाची मागणी केली नव्हती. केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यसभा सदस्य भागवत कराड यांचा समावेश झाल्यामुळेही मुंडे समर्थक नाराज आहेत, असे म्हटले जाते. पहिल्यांदा खासदार झालेले कराड यांना बळ दिल्यास मराठवाड्यात मुंडे यांचा प्रभाव कमी केला जाऊ शकेल, अशा नजरेतून पाहिले जात आहे.
बीडमध्ये जवळपास ७० जणांचे राजीनामेकेंद्रीय मंत्रिमंडळात खा. डॉ. प्रीतम मुंडे यांचा समावेश न केल्याबद्दल बीड जिल्हा भाजपमध्ये पसरलेला असंतोष वाढतच असून राजीनाम्याचे लोण पसरले आहे.
दोन दिवसांत जिल्ह्यातून जवळपास ७० जणांनी अध्यक्षांकडे आपल्या पदाचे राजीनामे पाठवले आहेत. राजीनामे देणाऱ्यांमध्ये पक्षाचे पदाधिकारी, जि. प., पं. स. सदस्य, नगरसेवक, सभापती, उपसभापतींचा समावेश आहे.