मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यामधील सुप्त संघर्ष सर्वांना परिचित आहे. भाजपमधील अंतर्गत वाद अनेकदा पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच पंकजा यांनी त्यांची खासदार बहिण प्रितम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्यानंतर काहीसा नाराजीचा सूर लावला. गेल्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा बीडमध्ये पराभव केला. या पराभवानंतर मुंडे आणि फडणवीस यांच्यातील संघर्ष आणखी वाढला.
पंकजा मुंडेंसोबत बहिणीसारखं नातं आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. 'पंकजा मला बहिणीप्रमाणे आहेत. मुंडे कुटुंबासोबत माझं पूर्वीपासून नातं आहे. गोपीनाथ मुंडेंसोबत मी अतिशय जवळून काम केलं आहे. त्यांच्याकडून मला खूप काही शिकता आलं. तेव्हापासून मुंडे कुटुंबासोबत भावनिक नातं आहे आणि ते राजकारणाच्या पलीकडचं आहे,' असं फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर पंकजा यांनी अतिशय मोजकी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडे नाराज नाहीत. त्यांचे कार्यकर्ते नाराज होते. त्यांची समजूत काढण्याचे प्रयत्न पंकजा करत आहेत. त्यांच्यासोबत बहिणीसारखं नातं आहे, असं फडणवीसांनी म्हटलं आहे. या विधानाबद्दल तुम्हाला काय वाटतं, असा प्रश्न पंकजांना विचारण्यात आला. त्यावर 'चांगलंय. त्यांनी दिलेलं उत्तर तुमच्यासाठी समाधानकारक असेल अशी माझी अपेक्षा आहे,' अशी त्रोटक प्रतिक्रिया पंकजा यांनी दिली.