मुंबई/नाशिक : भाजपाला महाराष्ट्रात उभारी देणाऱ्या एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यानंतर खडसेंच्या खांद्याला खांदा लावून भाजपा वाढविणारे नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा या देखील भाजपात नाराज होत्या. यामुळे खडसेंनंतर मोठे पाठबळ असलेल्या पंकजा य़ा शिवसेना किंवा राष्ट्रवादीत जातील अशी चर्चा सुरु होती. यातच पंकजांनी शरद पवारांचे कौतुक केल्याने राजकीय़ चर्चांना उधाण आले आहे.
पंकजांच्या या कौतुकाला शरद पवारांनी नाशिकमध्ये प्रतिसाद देत पंकजादेखील चांगले काम करत असल्याची कौतुकाची थाप मारली आहे. आधीच चर्चा त्यात पवारांनी पक्षात धनंजय मुंडे असताना केलेली स्तुती यामुळे चर्चांना आणखी उधान आले आहे.
पुण्यात राज्यातील ऊसतोड कामगार आणि ऊस वाहतूक संघटनांच्या विविध मागण्यांसंदर्भात बैठक मंगळवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक पार पडली. या बैठकीला पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि शरद पवार होते. यावेळी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे शेजारी शेजारी बसले होते. त्यांच्यात चर्चाही सुरु होती. या बैठकीत कामगारांच्या दरवाढीच्या मागणीबाबत या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला असून कामगारांना १४ टक्क्यांची दरवाढ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला. साखर कारखान्यांशी दरवाढीसंदर्भातील तीन वर्षांचा करार करण्यात येईल. तसेच मुकादमांचे कमिशन १९ टक्के करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. ऊसतोड कामगार संघटनांनी याबाबत समाधान व्यक्त केले असून कामगार आता कारखान्यांवर रूजू होतील.
या बैठकीनंतर पंकजा यांनी एक ट्विट केले. यामध्ये त्यांनी शरद पवारांना हॅट्स ऑफ म्हणत कोरोनाच्या परिस्थितीत इतका दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले ... पक्ष ,विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबानी शिकवले आहे, असे ट्विट केले आणि चर्चांना उधान आले. दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी शरद पवारांचाही उल्लेख केला. कारण धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये आहेत. शरद पवारांशी आपले कसे जवळचे संबंध आहेत. फोन केल्यावर ते कसे प्रश्न सोडवाला मदत करतात, हे त्यांनी यानिमित्ताने सांगितले.
रोहित पवारांनीही मानले धन्यवादपंकजा यांच्या याट्विटवर पवारांचे आमदार नातू रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी धन्यवाद ताई म्हणत पंकजा मुंडे यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या दिलदारपणा आणि खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "धन्यवाद ताई! राजकारणातील हा दिलदारपणा आणि खिलाडूवृत्ती फक्त महाराष्ट्रात दिसते आणि महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. पण अलीकडे आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याचा अवमान करणाऱ्यांनी आपल्याकडून मनाचा मोठेपणा जरूर शिकावा." असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.