सांगली : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवण्यात आलेली स्फोटके व त्यानंतर झालेल्या मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. यातून कोणीही सुटू नये, यासाठी मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचे पत्र म्हणजे कोणाची तरी सहानुभूती मिळवून या प्रकरणावरून लक्ष विचलित करण्याचाच प्रकार आहे, असा आरोप जलसंपदामंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत केला.
वाझे प्रकरणावरून सरकारला कोणताही धोका नसून, सरकार पूर्ण स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगली पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पाटील म्हणाले, हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य दिशेने चालू आहे. या प्रकरणात कितीही मोठ्या अधिकाऱ्याचा सहभाग असो, त्याच्यावर कारवाईची ठाम भूमिका घेतली आहे. एनआयएला तपासात सहकार्य आणि एटीएसचा तपास अधिक गतीने करून या प्रकरणाचे सत्य समोर आणण्यासाठी सरकार गंभीर आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके असलेली गाडी कोणी ठेवली, स्फोटके नागपूरहून आली की, कोठून आली आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू कसा झाला, याचे सत्य समोर आलेच पाहिजे. मात्र, कोणाची तरी सहानुभूती मिळविण्यासाठी व या प्रकरणावरून, त्याच्या तपासावरून लक्ष विचलित करण्यासाठी आता असे पत्र समोर येत आहे. या प्रकरणात ज्या ज्या अधिकाऱ्यांवर संशयाची सुई आहे, ते सुटू नयेत, हीच राज्य सरकारची सुरुवातीपासूनची भूमिका आहे.
सरकारने सुरुवातीपासूनच या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन कितीही मोठा अधिकारी असला, तरी त्याच्यावर कारवाईची भूमिका घेतली. त्यामुळे या प्रकरणावरून सरकारला कोणताही धोका नाही, असेही पाटील यांनी सांगितले.