पुणे : एकीकडे राजकीय विश्वात पार्थ पवार यांच्या उमेदवारीची निश्चिती मानली जात असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र सस्पेन्स कायम ठेवत पार्थ यांची उमेदवारी निश्चित नसल्याचे वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत गोंधळाची स्थिती निर्माण झाली असून कार्यकर्त्यानी मावळमधून नेमका उमेदवार कोण आहे हेच समजत नसल्याची प्रतिक्रिया नोंदवली आहे.
मावळ लोकसभा मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी पवार यांनी आज व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगव्दारे संवाद साधला. वाकड, कस्पटे वस्ती येथील यशोदा मंगल कार्यालय येथे झालेल्या व्हिडीओ कॉन्फ्रन्सला पार्थ पवार, युवकचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
या कॉन्फरन्समध्ये लोणावळ्याचे माजी शहराध्यक्ष राजू बोराटे यांनी मावळ मधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याबद्दल शरद पवार यांचे आभार मानले. तसेच मावळमधून पार्थ यांच्या विजयासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असं वक्तव्य केले. त्यावर शरद पवार यांना तात्काळ उत्तर देताना '' पक्षाकडून अद्याप कुणाचीही उमेदवारी जाहीर झालेली नाही. येत्या दोन, चार दिवसात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर करतील. पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप पक्षाने जाहिर केली नाही. पक्ष जो कोणी उमेदवार देतील त्याला विजयी करा असे वक्तव्य केले.
दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी स्वत: माढा मधून लढणार नसल्याचे सांगत, पार्थ पवार निवडणुक लढतील असं वक्तव्य केले होते. त्यामुळेच मावळमधून पार्थ यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती.पार्थ यांनीही तयारी म्हणून पिंपरी चिंचवड शहरासह मावळातही पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी वाढवल्या होत्या. मोरया गोसावी गणपती, एकविरा देवीचे दर्शन घेऊन त्यांनी एकप्रकारे प्रचाराचीच सुरूवात केल्याचे बोलले जात होते. मात्र पवार यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा संदिग्धता निर्माण झाली आहे.