आधी सीबीआय, मग 'जय श्रीराम' अन् आता 'ते' ट्विट; पार्थ पवारांच्या मनात नेमकं काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 07:43 AM2020-08-14T07:43:00+5:302020-08-14T07:43:27+5:30
पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेणाऱ्या पार्थ पवारांच्या ट्विटची राजकीय वर्तुळात चर्चा
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका असलेल्या पवार कुटुंबीयांत सध्या ‘पार्थ’मुळे महाभारत सुरू आहे. पार्थ पवारने ‘जय श्रीराम’चा नारा दिल्यामुळे नाराज असलेले आजोबा शरद पवार यांनी जाहीरपणे त्यांची कानउघाडणी केल्यानंतर वडील अजित पवार यांनी ‘पार्थ लहान आहे, समजून घ्या’, असे म्हणत पुत्राची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. विशेष म्हणजे आजोबांनी फटकारल्यानंतर पार्थ पवारांनी केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. पार्थ यांनी केलेल्या ट्विटचे विविध अर्थ लावले जात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी अलिकडच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेशी विसंगत भूमिका घेतल्यामुळे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार चांगलेच नाराज आहेत. विशेषत: पार्थने राम मंदिरासंदर्भात लिहिलेल्या पत्रामुळे ते अधिकच संतापले आहेत. ‘पार्थ अपरिपक्वआहे. त्याच्या बोलण्याला मी काडीचीही किंमत देत नाही’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी काल मीडियासमोर व्यक्त केली.
पार्थच्या ‘वेगळ्या’ भूमिकेवरून बुधवारी रात्री ‘सिल्व्हर ओक’वर बरेच रामायण घडल्याचे वृत्त आहे. शरद पवार यांनी खास निरोप देऊन अजित पवारांना घरी बोलावून घेतले. पार्थने राम मंदिरासंदर्भात केलेली विधाने पक्षाच्या भूमिकेशी विसंगत आहेत. विशेषत: एका विशिष्ट समुदायाबद्दल केलेले विधान तर अत्यंत आक्षेपार्ह आहे. हे प्रकार वेळीच थांबवले पाहिजेत, नाही तर ज्या भूमिकेवर आपण पक्ष उभा केला, त्या भूमिकेला तडा जाईल, अशा शब्दांत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यावर पार्थ अजून लहान आहे. तो हळूहळू तयार होईल, अशी सारवासारव अजित पवारांनी केली. मात्र, त्याला असे जाहीरपणे बोल लावणे योग्य नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. काका-पुतण्याच्या या संवादावेळी तिथे उपस्थित असलेले जयंत पाटील यांनी पार्थची आपण समजूत काढू, असे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचे सुत्रांनी सांगितले.
पार्थच्या नव्या ट्विटची चर्चा
पार्थने सकाळीच एक ट्विट करून, ‘कोरोनाच्या लढ्यात आपण सगळे कष्ट करत आहोत, यातून चांगलेच काहीतरी निघेल. महाराष्ट्राचे हे स्पिरीट आहे. आपण हार मानत नाही’ अशा आशयाचे ट्विट केले. सोबत त्याने गणरायाची मूर्तीही जोडली होती. मात्र, त्या ट्विटमधील ‘आपण हार मानत नाही’ या वाक्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.
From low key celebrations to supporting the fight against covid by helping hospitals, all are doing their best to overcome the crisis.
— Parth Pawar (@parthajitpawar) August 13, 2020
This is the spirit of our Maharashtra, we never give up!https://t.co/F51XoMCMVm
अजित पवारांचे मौन कायम
‘सिल्व्हर ओक’वरील रात्रीच्या घडामोडीनंतर गुरुवारी दिवसभर पार्थ पवारच्या गोटात सामसूम होती. तर अजित पवारांनी देखील या विषयावील आपले मौन सोडले नाही. दिवसभराच्या बैठका आटोपून ते तडक पुण्याला निघून गेले.