वाचून दाखविलेल्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ गडबडले; पण..लगेच म्हणाले.. '' सॉरी ''
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 03:21 PM2019-03-18T15:21:51+5:302019-03-18T15:44:56+5:30
कागदावर लिहून आणलेले भाषण त्यांनी वाचून दाखविले खरे, पण..
पिंपरी : मावळ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा.. सुरुवातीला झालेली जोरदार घोषणाबाजी.. आणि त्यामुळे नवख्या उमेदवाराचा काही काळ उडालेला गोंधळ..मावळ लोकसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या माघारीनंतर ज्यांचे राजकारणात आगमन झाले ते पार्थ पवार भाषणासाठी उभे राहिले.. कागदावर लिहून आणलेले भाषण त्यांनी वाचून दाखविले खरे, पण.. अवघ्या तीन मिनिटांच्या भाषणात पार्थ अनेकदा गडबडले. परंतु, त्यांनी आज आपले पहिलेच भाषण आहे, त्यामुळे चूकभूल झाली तर माफ करा, अशी आर्जवही केली.
मावळ लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा चिंचवड येथे रविवारी सायंकाळी झाला. या मेळाव्यात पहिल्यांदाच पार्थ पवार भाषणास उभे राहिले आणि कागदावर लिहून आणलेले भाषण अडखळत वाचून दाखविले. चिंचवड येथील मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री मदन बाफना, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, राष्टÑवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, माजी आमदार विलास लांडे, अण्णा बनसोडे उपस्थित होते.
या मेळाव्यातील अडखळ्लेल्या भाषणात पार्थ म्हणाले, राजकारणात जरी नवीन असलो तरी तुम्ही विश्वास दाखवा तो मी सार्थ करुन दाखवेन..तसेच या मतदार संघाला बारामती व पिपंरी चिंचवडसारखे विकसित करेन.पार्थ पवार यांच्या भाषणाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे काही काळ त्यांचा गोंधळ उडाला.त्यानंतर कागदावर लिहून आणलेले भाषण वाचून दाखविले.या तीन मिनिटांच्या भाषणात त्यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर बेरोजगारी , भ्रष्टाचार, यांसारख्या मुद्द्यांवरून टीका केली. पण मावळ लोकसभा मतदारसंघातील कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नांवर यांनी भर दिला नसल्याचे दिसून आले. तरीही उपस्थितांनी टाळ्या वाजविल्या.
.........................
तेव्हा कुठे गेली ५६ इंचाची छाती : शरद पवार
जवानांची हत्या झाल्यानंतर जवानांच्या कुटुंबांचे सांत्वन करण्यापेक्षा पंतप्रधान धुळ्याचे दौरे करत होते. फिरत होते. तेव्हा छप्पन इंचाची छाती? असे उर बडवून घेण्यातच पंतप्रधानांनी धन्यता मानली. राफेलची फाईल संरक्षण खात्यातून चोरीला गेली. संरक्षण विषयक कागदपत्रे सांभाळता येत नाहीत, आणि कुठे घेऊन बसलात छप्पन इंचाची छाती. ना खाऊंगा ना खाने दुँगा असे पंतप्रधान म्हणतात. साडेतीनशे कोटींचे राफेल सोळाशे कोटींवर पोहोचले कसे? ज्या कंपनीने कधी कागदातील विमान बनविली नाही. त्यांना राफेल विमान बनविण्याचे काम दिले. यावरून दाल मे कुछ काला है, हे दिसून येते. अशा शब्दात शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकारवर टीका केली.
...................
जयंत पाटील म्हणाले, देशाचे कर्ज ५१ लाख कोटींवरून ८० लाख कोटींवर गेले. ३१ लाख कोटींचे कर्ज वाढविले गेले, कशासाठी? एक लाख कोटी रुपयांचा केलेल्या खर्चाचा हिशेब संसदेत दिला नाही. यावरून मोदी सरकारचा पारदर्शक कारभार लक्षात येईल.
..............
दिवसा इकडे आणि रात्री तिकडे हे खपवून घेतले जाणार नाही. मॅचफिक्सिंग तर कदापि सहन केली जाणार नाही. असा सज्जड दम अजित पवार यांनी भरला.