नवी दिल्ली - मध्य प्रदेशचे माजी आरोग्यमंत्री आणि पाटणचे भाजपाचे आमदार अजय विष्णोई (BJP Ajay Vishnoi) यांनी आपल्याच पक्षाच्या खासदारांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. त्यांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विष्णोई यांनी आपल्याच पक्षाच्या खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री मेनका गांधी (Menka Gandhi) यांना "घटिया महिला" असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी मेनका गांधींची एक ऑडिओ टेप व्हायरल झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर पशुवैद्यकांशी अभद्र भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात येत आहे.
अजय विष्णोई अनेकवेळा आपल्याच सरकारच्या कारभारावर प्रश्न विचारत असतात. शनिवारी त्यांनी याबाबच ट्वीट केलं आहे. "खासदार श्रीमती मेनका गांधी यांनी पशुवैद्य डॉ. विकास शर्मा यांच्याशी ज्या शब्दांत बोलल्या त्यावरून पशुवैद्यकीय महाविद्यालय जबलपूर हे घटिया दर्जाचे असल्याचे सिद्ध होत नाही, परंतु यामुळे मेनका गांधी अत्यंत घटिया महिला असल्याचं सिद्ध होतं. त्या माझ्या पक्षाचा खासदार आहेत, याची मला लाज वाटते" असं अजय विष्णोई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. यावरून नाव वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
व्हायरल झालेल्या ऑडिओ टेपमध्ये मेनका गांधी जबलपूरच्या नानाजी देशमुख पशुवैद्यकीय विद्यापीठाचे पशुवैद्यकीय डॉक्टर विकास शर्मा यांच्याशी संभाषण करीत आहेत. या दरम्यान त्यांनी संपूर्ण पशुवैद्यकीय महाविद्यालयाला घटिया म्हटलं होतं. हा ऑडिओ 21 जूनचा आहे. डॉ. विकास शर्मा आणि डॉ. एल.एन. गुप्ता यांनी एका श्वानावर शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याची प्रकृती खालावली. डॉक्टरांचा असा आरोप आहे की मेनका गांधींनी त्यांना फोन करून धमकावले आणि श्वानाच्या उपचारासाठी 70 हजार रुपये देण्यास सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"मोदींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष, आता झोळी घेऊन निघून जाण्याची आलीय वेळ"
कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, लसीकरण यावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात येत आहे. अनेकांनी विविध मुद्द्यांवरून निशाणा साधला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका सध्या चर्चेचा विषय झाला आहे. याच विषयावर एका वाहिनीने घेतलेल्या चर्चासत्रादरम्यान काँग्रेसच्या (Congress) नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली आहे. "मोदींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष, आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे " असा सणसणीत टोला काँग्रेसने मोदी सरकारला लगावला आहे. उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची भूमिका काय असेल असा प्रश्न या चर्चेदरम्यान विचारला असता त्यावर काँग्रेसच्या प्रवक्त्या रागिणी नायक (Ragini Nayak) यांनी उत्तर दिलं आहे यावेळी "मोदीजींना ना धड देश सांभाळता येतोय ना पक्ष अशी अवस्था भारतीय जनता पार्टीची झाली आहे. भाजपाशासित भागांमध्ये गोंधळ माजला आहे. मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता. असं वाटतंय की आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे" असं नायक यांनी म्हटलं आहे.