नवी दिल्ली – पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी(Mamata Banerjee) यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा लोकशाहीवर हल्ला करत आहे. आमचे फोन टॅप केले जात आहे. पेगासस धोकादायक आणि क्रूर आहे. मी कुणाशीही बोलू शकत नाही. तुम्ही हेरगिरी करण्यासाठी खूप पैसे देत आहात. मी माझा फोन प्लास्टर केला आहे आता केंद्रालाही प्लास्टर करायला हवं नाहीतर देशात बर्बाद होईल असा घणाघात ममता बॅनर्जींनी केंद्रावर केला आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, सर्वांचे फोन रेकॉर्ड केले जात आहेत. ते ऐकले जात आहे. मी ओडिशाचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि शरद पवार(Sharad Pawar) यांच्याशी बोलू शकत नाही. सरकारी पैशाचा वापर हेरगिरीसाठी केला जात आहे. पेगाससने न्यायाधीश, मंत्री, आमदार, खासदार सर्वांचे फोन ताब्यात घेतलेत. लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही वाचवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. माझा फोन टॅप केला जात आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच भाजपा एक लोडेड व्हायरस पार्टी आहे. मी व्यक्तिगत नरेंद्र मोदींविरोधात बोलत नाही. मी शिष्टाचार पाळते परंतु मोदी राजकारणात खालच्या पातळीला गेले त्यांना लोकांनी उत्तर दिलं आहे. संपूर्ण देश बंगालमधील जनादेश पाहत आहे. लोकांना विकास हवा परंतु तुम्ही पक्षपाती राजकारण करता. मी माझ्या राज्यातील लोकांचे आभार मानते. आम्ही पैसे, ताकद आणि सर्व एजेंसीविरोधात लढलो. अनेक अडचणींना सामना करून विजय मिळवला. बंगालमधील लोकांनी मतदान केले आणि देश, जगातील अनेकांनी आशीर्वाद दिला असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
भाजपला सत्तेतून बाहेर करेपर्यंत 'खेला होबे'
ममता म्हणाल्या, मतदानानंतर राज्यात कसल्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही. मतदानाच्या बरोबर आधी, ते आमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकत होते, आम्हाला माहीत आहे. आता जोवर भाजपला सत्तेतून काढत नाही, तोवर 'खेला होबे'. १६ ऑगस्टला खेला दिवस साजरा करणार असल्याचं ममता म्हणाल्या. बंगालच्या जनतेने 'मा, माटी आणि मानुष'ची निवड केली आहे. त्यांनी अर्थशक्तीला नाकारले आहे. भाजप हुकूमशाहीवर उतरला आहे. त्रिपुरात आमचा कार्यक्रम रोखला गेला, हीच लोकशाही आहे का? ते देशातील संस्था नष्ट करत आहेत. मोदी सरकारला प्लास्टर करण्याची आवश्यकता आहे. आता आपल्याला काम सुरू करायचे आहे असंही त्यांनी सांगितले.