नवी दिल्ली : Pegasus Scandal : इस्रायलची एक कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर पेगाससचा (Pegasus ) वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचे उघड झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांचेही नाव असल्याचे समोर येत आहे. याबाबत बोलताना प्रशांत किशोर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. आपला फोन टॅप होतो आहे, याचा संशय आपल्याला आला होता. त्यासाठी पाच वेळा हँडसेट बदलला, तरीही फोन टॅपिंग (Phone Tapping) सुरूच राहिले, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
प्रशांत किशोर हे 2014 साली भाजपाचे लोकसभा निवडणुकीतील रणनितीकार होते. भाजपाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी इतर पक्षांसोबत काम करायला सुरुवात केली. दरम्यान, पेगाससचा वापर करून फोन टॅप केल्याप्रकरणी प्रशांत किशोर यांनी NDTVशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, आपला फोन टॅप होतो आहे, याचा संशय आपल्याला आला होता. त्यासाठी पाच वेळा हँडसेट बदलला, तरीही फोन टॅपिंग (Phone Tapping) सुरूच राहिले. याचबरोबर, 'द वायर'ने दिलेल्या रिपोर्टमध्ये फॉरेन्सिक विश्लेषणाच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, प्रशांत किशोर यांच्या फोनमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी 14 जुलैला छेडछाड करण्यात आली होती.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्यासह दोन केंद्रीय मंत्र्यांचीही हेरगिरी केल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय मंत्र्यांमध्ये आयटी मंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हाद पटेल यांची नावे आहेत. याबाबत 'द वायर'ने वृत्त दिले आहे. लीक झालेल्या डेटामध्ये 300 भारतीयांचे मोबाइल नंबर आहेत. यात 40 मोबाइल नंबर हे पत्रकारांचे आहेत. याशिवाय तीन बडे विरोधी पक्षातील नेते, केंद्र सरकारमधील दोन मंत्री, संरक्षण संस्थांचे विद्यमान आणि माजी प्रमुख अधिकारी, उद्योगपतींचा समावेश आहे. हे मोबाइल नंबरची 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2018-19 दरम्यान हेरगिरी करण्यात आली होती.
काँग्रेस नेते राहुल गांधींचा आरोपकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगासस सॉफ्टवेअर हॅकिंग प्रकरणावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. 'तुमच्या फोनमध्ये ते काय वाचतात हे आम्हाला माहीत आहे', अशा आशयाचे ट्विट करुन राहुल यांनी सरकारला टोला लगावला. रविवारी आंतरराष्ट्रीय माध्यमांनी जारी केलेल्या रिपोर्टमध्ये पेगासस सॉफ्टवेअरद्वारे भारतातील पत्रकार आणि नेत्यांसह इतरांचे फोन टॅप करण्यात आल्याचा दावा केला आहे.
काय आहे पेगासस हॅकिंग वाद?इस्रायलची एक कंपनी एनएसओ ग्रुपने हॅकिंग सॉफ्टवेअर पेगाससचा वापर करून अनेकांचे फोन टॅप केल्याचे उघड झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार लीगल कम्युनिटीशी संबधित लोक, उद्योजक, सरकारी अधिकारी, वैज्ञानिक, कार्यकर्ते आणि इतरांचे नंबर या लिस्टमध्ये आहेत. या लिस्टमध्ये 300 हून अधिक भारतीयांचे मोबाईल नंबर असल्याचा दावा केला जात आहे. हा रिपोर्ट वॉशिंग्टन पोस्टसह 16 माध्यम कंपन्यांनी पब्लिश केली आहे. रिपोर्टच्या पहिल्या टप्प्यात 40 पत्रकारांचा समावेश आहे. दावा करण्यात येतोय की, 2018-2019 दरम्यान या पत्रकारांचे फोन हॅक करण्यात आले. यादरम्यान वॉट्सअॅप कॉल, फोन कॉल, रेकॉर्डिंग, लोकेशन इत्यादी महत्वाची माहिती घेण्यात आली. खुलासा करणाऱ्या कंपन्यांनी सांगितले की, ही रिपोर्ट अनेक टप्प्यात जाहीर केली जाणार आहे. येणाऱ्या टप्प्यात नेते, मंत्री आणि इतर व्यक्तींची नावे असू शकतात.
केंद्राचे स्पष्टीकरण रविवारी रात्री साडे नऊ वाजता हा रिपोर्ट समोर आली. यानंतर लगेच केंद्र सरकारने या रिपोर्टवर स्पष्टीकरण दिले. केंद्र सरकारने फोन हॅकिंग आणि यासंबंधी आरोपांचे खंडन केले आहे. तसेच, या रिपोर्टला भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी तयार करण्यात आल्याचे म्हटले आहे. आपला बचाव करताना सरकारने म्हटले की, भारताच्या लोकशाहीत प्रायव्हसी एक अधिकार आहे. हा रिपोर्ट पूर्णपणे खोटी आहे.