माल्दा : डाव्यांच्या सत्तेला कंटाळून पश्चिम बंगालमधील जनतेने ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या हाती सत्ता दिली. पण कम्युनिस्टांची सत्ताच चांगली होती, अशी म्हणायची वेळ तृणमूलने जनतेवर आणली आहे, अशी टीका भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी केली.तृणमूलचे कार्यकर्ते व नेते यांच्या गुंडगिरीमुळे जनता त्रस्त झाल्याचा आरोप करताना शहा म्हणाले, आतापर्यंत भाजपा व अन्य राजकीय पक्षांच्या ६0 कार्यकर्त्यांचे राज्यात खून झाले आहेत. असा तृणमूलचा कारभार आहे. पण जनता यापुढे हे खपवून घेणार नाही, ही मला खात्री आहे. भाजपाने सभा, मेळावे घेऊ नयेत, म्हणून ममता सरकारने खूप प्रयत्न केले. पण त्यांना आता यश आले नाही आणि यापुढेही येणार नाही,अन्य देशांतील लोकांच्या घुसखोरीला आळा घालण्यासाठी आम्ही कायदा करू पाहत आहोत. पण ममता बॅनर्जी यांचा त्याला विरोध आहे. म्हणजेच त्यांना राज्यात व देशांत घुसखोर यावेत, असेच वाटत असावे. मोदी सरकारने पश्चिम बंगाल सरकारच्या निधीमध्ये अडीचपट वाढ केली. पण ममता सरकारने या निधीचा वापरच केला नाही. त्यांनी राज्याला अधिक गरीब बनवले. गोतस्करांनाही त्यांचा आशीर्वाद आहे, अशी टीका त्यांनी केली.>हे खपवून घेणार नाहीबंगालमध्ये मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही, इतकी तृणमूलच्या कार्यकर्त्यांची गुंडगिरी आहे, पण भाजपा ही गुंडगिरी खपवून घेणार नाही आणि जनता तृणमूलला सत्तेबाहेर केल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही अमित शहा यांनी केला.
कम्युनिस्टांचीच सत्ता चांगली होती, असे बंगालची जनता म्हणते आहे - अमित शहा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 6:26 AM